सरकारने लाजेखातर पेट्रोल-डिझेल दर कमी केले- जयंत पाटील
ठाण्याच्या कार्यकर्ता मेळाव्यात सरकारवर डागली तोफ…
ठाणे : सरकारने लाजेखातर म्हणून आज पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले असल्याची जोरदार टिका प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ठाणे येथील कार्यकर्ता मेळाव्यात केली.
त्यांनी मार्गदर्शन करताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील जनता नाराज नाही तर ती मोदींवर रागावली आहे कारण त्यांनी देशातील जनतेला फसवलं आहे. त्यामुळे ही जनताच बदला घेईल हे निश्चित आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
आपला लढा हा सेना-भाजपबरोबर आहे असे सांगतानाच भाजपाच्या मागे फरफटत जाणाऱ्या सेनेचा आणि त्यांच्या प्रमुखांचा चांगलाच समाचार घेतला. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्यांना हात घातला शिवाय कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी भरण्याचेही काम केले.
या मेळाव्यामध्ये माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. तर या मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले.गेले दोन दिवस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचा संयुक्त दौरा सुरु असून या दौऱ्याला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज अंबरनाथ, भिवंडी आणि शेवटी ठाणे शहरामध्ये कार्यकर्ता मेळावा पार पाडला. भिवंडीमध्ये निरीक्षक नसीम सिद्दीकी,नगरसेवक खालीद गुड्डू आदींसह इतरप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.