ओबीसीला धक्का न लावता आरक्षण दिल्याबद्दल पंकजा मुंडेंनी केले मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचे स्वागत केले आहे. ओबीसी ला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही वर्गाचे समाधान केले आहे, त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
आरक्षणाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, गेली अनेक वर्षे हा विषय लोकांच्या मनात होता. त्यासाठी आंदोलनेही झाली परंतु मराठा समाजाने अत्यंत संयमाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. कुठलाही पुढारी अथवा राजकीय नेता समोर न ठेवता सर्व ठिकाणी शांततेत आंदोलने झाली. आता या संघर्षातून समाजाला दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
मराठा समाजाला आरक्षण देतांना आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये याबाबत ओबीसी मध्ये अस्वस्थता होती, ओबीसी ला धक्का लावू नये अशी बहूजन नेत्यांचीही मागणी होती शिवाय मराठा समाजाच्या नेत्यांचाही याविषयी कांही आक्षेप नव्हता. मराठा समाज हा शैक्षणिक व नोकरीच्या दृष्टीने मागासलेला आहे, राजकीय दृष्ट्या नाही, त्यामुळे त्यांना शिक्षण व नोक-यांमध्ये आरक्षणाची अपेक्षा होती ती सरकारने पुर्ण केली आहे, त्याबद्दल आपल्याला आनंदच झाला आहे अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.