बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांवर कारवाई करणार : विनोद तावडे

बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांवर कारवाई करणार : विनोद तावडे

मुंबई : राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांवर कारवाई करण्याबाबत शासन गंभीर आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याची कार्यवाही सुरु आहे, येत्या २ महिन्यात ही कार्यवाही पूर्ण करुन दोषी आढळलेल्या संबंधिताविरुध्द कारवाई करुन त्यांच्यावर आवश्यक कलमे लावण्यात येतील. तसेच बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांना पाठीशी घालण्यांविरुध्दही कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांवरील कारवाई संदर्भात आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राज्यातील विशेष पटपडताळणी मोहिमेमध्ये राज्यातील १४०४ शाळांमध्ये सदर दिवशी ५० टक्के पेक्षा कमी उपस्थिती आढळून आली. विशेष पटपडताळणी मोहिममध्ये ५० टक्के कमी उपस्थिती आढळलेल्या व त्यानंतर कमी पटसंख्या असलेल्या व्यवस्थापनांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना २४ जुलै २०१८ रोजी दिलेले आहेत. याप्रकरणी काही शाळा उच्च न्यायालयात गेल्या. त्यावेळी न्यायालयाने शाळांविरुध्द कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शाळांमधील पटसंख्या सरल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरलमध्ये लिंक करण्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे, १५ टक्के काम शिल्लक असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही तावडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे २०१२ चा यासंदर्भातील शासन निर्णय पुनर्रचित करण्याबाबत विचार करण्यात येईल.

राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त्या मान्यता रद्द करण्याबाबत संबंधित शिक्षकांची सुनावणी घेऊन निर्णय देण्याची कार्यवाही सुरु आहे.सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. यापुढील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यातून करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयातही यासंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेची प्रशंसा केली आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करताना गुणवत्तापूर्ण उमेदवारीची निवड करण्यात येईल. त्यामुळे शिक्षक भरती होताना होणा-या भ्रष्टाचाराला आळा बसेल असा विश्वासही विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिक्षकेतर भरती संदर्भात उच्च स्तरिय समितीचा मसुदा प्राप्त झाल्यानंतर लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही श्री.तावडे यांनी स्पष्ट केले. दिलिप वळसे पाटील, शशिकांत शिंदे आदी सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.दहिसर येथील रुस्तमजी टुपर्स शाळेने नियमबाह्य शुल्क वाढ केल्याबाबत मुंबई महापालिकेच्या शिक्षणधिका-यांमार्फत विभागीय चौकशी करण्यात आली आहे. परंतु याबाबत विभागीय स्तरावर चौकशी करण्यात येईल असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. विधानसभेत तृप्ती सावंत यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

Previous articleभाजप हीच खरी ‘गॅंग ऑफ वासेपूर’ : विखे पाटलांचा  सरकारवर हल्लाबोल
Next articleआनंदाची बातमी : मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी