मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचान्यांना एल. आय.सी. योजनतंर्गत निवृत्ती नंतर देण्यात येणारे एक रक्कमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
मंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती ,राजीनामा,मृत्यू,सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्यसेविका, पर्यवेक्षिका या पदावर निवड होईपर्यंत एल.आय.सी. योजनेतंर्गत एक रक्कमी लाभ देण्याबाबतची योजना राज्यात सुरु आहे. या योजने अंतर्गत सन २०२०-२१ या वर्षांत ९०० प्रकरणे आली होती यापैकी ८७५ प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे तृटी असणारे आणि मागील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून या सेविकांची दिवाळी गोड करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
एल आय सी मार्फत अंगणवाडी सेविकांना वयाची ६५ वर्ष पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर एक लाख रुपये एकरकमी लाभ देण्यात येणार आहे. तसेच राजीनामा , सेवेतून काढून टाकण्यात आलेले व सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावल्यालेल्या सेविकांच्या वारसदारांस ही एव्हढीच रक्कम देण्यात येणार आहे.मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ७५ हजार रक्कम देण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले.