कुणी जाहिराती दिल्या,बॅनर,पोस्टर लावले तरी काहीच फरक पडणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । पालघर येथे झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केल्यानंतर फडणवीस यांची नाराजी दूर झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर गेली दोन दिवस जाहिरातीवरून शिवसेनेवर ( शिंदे गट ) नाराज असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही नाराजीचा सुर मावळला आहे.भाजपा सेना युती घट्ट आहे.राज्यातील १३ कोटी जनतेने हे सरकार मान्य केले आहे. कुणी जाहिराती दिल्या, बॅनर, पोस्टर लावले तरी काहीच फरक पडत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेकडून राज्यातील सर्वच वर्तमान ‘देशात मोदी,महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाची जाहिरात देण्यात आली होती.या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झाले होते.त्यांनी दोन दिवस मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणे टाळले होते.या जाहिरातीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नाराज होते.मात्र पालघर येथे झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमानंतर बावनकुळे यांचाही नाराजीचा सुर मावळला आहे.एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते विचाराने प्रगल्भ आहेत.सत्तेकरिता एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर यावा यासाठी काम करीत आहेत. भाजपा सेना युती घट्ट आहे. राज्यातील १३ कोटी जनतेने हे सरकार मान्य केले आहे. कुणी जाहिराती दिल्या, बॅनर, पोस्टर लावले तरी काहीच फरक पडत नाही. भाजपाच्या सदस्यांना पोस्टरबाजी करू नये अशा सूचना दिल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

२२ व्या विधि आयोगाने समान नागरी कायद्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन करून ते म्हणाले, की संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत.आता सुरू झालेली प्रक्रिया देशाच्या हितासाठी गरजेची आहे. ३७० कलम हटविणे, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणे आणि समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटविले आहे. राम मंदिराचे बांधकाम वेगात सुरू आहे.समान नागरी कायदा अतितातडीने लागू झाला पाहिजे. भाजपाचीही हीच भूमिका असून,प्रत्येक धर्म व समाजाचा नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या मनातील इच्छा आहे.भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. जी आश्वासने दिली त्यांची पूर्तता होईल असेही बावनकुळे म्हणाले.

विरोधीपक्षांकडून काही प्रकरणे तयार करून राज्याच्या गृहखात्याला व देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत.ती कारस्थाने कशी तयार केली जातात याचा अंदाज आजच्या संजय राऊत धमकी प्रकरणावरून लक्षात येते. शरद पवार यांनी भाजपा आणि युती सरकारच्या काळात ख्रिश्चन आणि मुस्लिमांना धोका असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर संभाजीनगर येथे प्रकरण झाले, बंटी पाटील यांच्या वक्तव्यानंतर कोल्हापुरात दंगली झाल्या. एक नॅरेटीव्ह सेट केला जात आहे. फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यातील गृहखाते उत्तम काम करीत आहे असेही ते म्हणाले.भाजपा-सेना युतीमध्ये कोण लढणार हे ठरविण्याचा अधिकार केंद्रीय संसदीय मंडळाला आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे समन्वय करतील.स्थानिकांना काहीच ठरविण्याचा अधिकार नाही.भाजपा सेना युती विचारांची आहे त्यामुळे ती एकत्र राहणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे. ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तिन्ही पक्षांचा विचार वेगळा आहे. तेथे तीन तिघाडा काम बिघाडा होणार आहे.येत्या रविवारी आशीष देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार अशी माहिती देवून कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपात पक्षप्रवेश वाढले आहेत आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही जिंकू असा दावाही त्यांनी केला.

Previous articleये फेव्हिकॉल का जोड है टूटेगा नहीं ! मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे पुन्हा ” मिले सुर मेरा तुम्हारा “
Next articleलोकल मधिल ” त्या ” घटनेवरून अजित पवारांनी गृहखात्यावर साधला निशाणा