मुंबईतील मतदान प्रक्रियेच्या ढिसाळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे.बहुतेक ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीन राबवण्यात येत असल्याने मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.अनेक मतदारसंघात मोठा घोळ झाल्याचे दिसून आल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून संताप व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला असतानाच या गोंधळाची राज्याचे मुख्य सचिव यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सोमवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी गोंधळाच्या परिस्थिती मतदान पार पडले.मुंबईतील बहुतेक ठिकाणी सकाळी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.बहुतेक ठिकाणी मोठा घोळ झाल्याचे चित्र होते.मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला तर,मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीन राबवण्यात येत असल्याने मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा लागल्या होत्या.या प्रकारामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला होता.सोमवारी मतदानाच्या दिवशी झालेल्या या ढिसाळ कारभाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.मतदान केंद्रांवर ज्या ठिकाणी गैरसोय होती, मतदानाला विलंब लागत होता,या सर्व बाबींची होणार चौकशी करण्यात येणार आहे.मुख्य सचिवांनी तातडीने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

Previous articleपुण्यातील ” हिट अँड रन ” प्रकरणी कुणालाही सोडणार नाही
Next articleमुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा पूर्वनियोजित कट होता