तळागाळातल्या माणसात बाळासाहेबांनी उत्साह भरला
मुख्यमंत्री
मुंबई दि.१७ शिवसेना प्रमुख बाळासाहेबांपासून प्रेरणा मिळावी यासाठी या स्मारकाची संकल्पना आखण्यात आली असून, प्रेरणा देणारे स्मारक उद्धवजींच्या संकल्पनेतून साकारले जाणार आहे. असे सांगतानाच तळागाळातल्या माणसामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी उत्साह भरला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महापौर बंगल्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
जे लोक बाळासाहेबांच्या स्मारकांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत त्यांच्यापर्यंत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि ऊर्जा पोहोचवण्याचे काम या संकेतस्थळातून होईल असा विश्वास आहे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाचव्या स्मृतिदिनानिमित्त राज्याच्या काना-कोप-यातून शिवसैनिक दादर येथील स्मृतिस्थळावर दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सकाळी अकराच्या सुमारास सहकुटुंब शिवतीर्थावर जाऊन मानवंदना दिली. त्यांवेळी शिवसेनेचे खासदार, आमदार व मंत्री उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना मानवंदना दिली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. महापौर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण केले. याचवेळी राज्यातील शेतक-यांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी दोन कोटी रुपयांचा धनादेश उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.