परळी – बीड – नगर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने वितरित केला ७७ कोटीचा निधी
पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांना यश
बीड दि. १७ परळी बीड नगर रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून या प्रकल्पासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाने ७७ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी रेल्वे बोर्डाला वितरित केला आहे. यासंबंधीचे आदेशही गृह विभागाने निर्गमित केले आहेत.
परळी – बीड – नगर या रेल्वे मार्गाकरिता दोन हजार ८२६ कोटी रुपये एवढा खर्च अंदाजित असून यातील एक हजार ४१३ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने मंत्रिमंडळ स्तरावर घेतला आहे. त्यानुसार सदर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ऑक्टोबर २०१७ पर्यंत एकूण ६३९ कोटी ६४ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पासाठी याच कालावधीत रेल्वे विभागाने ७१६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी वितरित केला आहे. राज्य शासनाच्या हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०१७ – १८ करिता प्रकल्पासाठी अर्थसंकल्पित झालेल्या निधीपैकी ७७ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी आज वितरित करण्यात आला. यामुळे केंद्र व राज्य शासनाचे मिळून आतापर्यंत १ हजार ४३३ कोटी ६८ लाख रुपये या प्रकल्पाला मिळाले आहेत.
या रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून २०१९ पर्यंत रेल्वे प्रत्यक्ष धावण्याचे जिल्हा वासियांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्णत्वास येणार आहे. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे हया त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाकडून हा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी आजच रेल्वे बोर्डाकडे वर्ग करण्यात आला असून तसे आदेश गृह विभागाने निर्गमित केले आहेत.