काळबादेवी परिसरातील सुवर्ण कारागिरांचे व्यवसाय स्थलांतरीत करणार
मुंबई : मुंबईतील काळबादेवी परिसरातील नागरिकांच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून या परिसरातील सुवर्णकार कारागिरांनी उद्योग स्थलांतर करावा. मुंबई महापालिकेने यासंदर्भात बैठक घेऊन कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात काळबादेवी भागात राहणारे हरकिशन गोरडीया यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा उद्योग अन्यत्र स्थलांतर करण्याबाबत संबंधितांना नोटीस देण्याच्या सूचना दिल्या.आज झालेल्या लोकशाही दिनामध्ये तक्रारींचे प्रमाण कमी असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारे सामान्यांच्या कामांना गती द्यावी. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा स्थानिक पातळीवरच निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
काळबादेवी भागातील प्रत्येक घरात सुवर्णकार कारागिरांचा व्यवसाय प्रमाणावर आहे. तेथे भट्ट्या, धुराच्या चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे धुराच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत असून व्यवसायासाठी भट्ट्यांचा वापर होत असल्याने अग्निसुरक्षेची काळजी पुरेशा प्रमाणात घेतली जात नसल्याची तक्रार गोरडीया यांनी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांच्या अग्निसुरक्षेच्या कारणावरुन मुंबादेवी,काळबादेवी परिसरातील हा व्यवसाय मुंबई परिसरातच स्थलांतर करावा. या व्यवसायिकांना तीन महिन्याची नोटीस द्यावी. मुंबई महापालिकेने या संदर्भात बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा.