विदर्भ-मराठवाड्यात वादळवाऱ्यासह गारपीटीची शक्यता

विदर्भ-मराठवाड्यात वादळवाऱ्यासह गारपीटीची शक्यता

शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात येत्या १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या पिकांची कापणी करुन शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करावी. सर्व नागरिकांनी वादळ, विजा आणि गारपीटीपासून संरक्षण होण्‍यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा,नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये तसेच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये या दिवशी गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे. ११ व १२ फेब्रुवारी रोजी या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट होण्याच्या शक्यतेसह या वाऱ्यांची तीव्रता अधिक असेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये या दोन्ही दिवशी अधूनमधून वादळी वारे वाहण्याची व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. १३ फेब्रुवारी रोजी वादळवाऱ्याची तीव्रता कमी होईल तर १४ फेब्रुवारीपासून हवामान सर्वसाधारण होण्याची शक्यता आहे.

कापणीवर आलेल्या ज्वारीसारख्या पिकांची कापणी करुन धान्य योग्यरित्या साठवावे. शेतमालाच्या व्यापाऱ्यांनी देखील शेतमालाची संरक्षितपणे साठवणूक करावी. सर्व नागरिकांनी वादळी वारे, विजा आणि गारपीटीपासून स्वत:सह गुराढोरांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleतोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीशी कोणताही संबंध नाही
Next articleकेंद्राच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here