नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. या दोन्ही नेत्यां मध्ये सुमारे अर्धा तास बंद दरवाजाआड चर्चा झाली. मात्र या बैठकीतील तपशील समजू शकला नाही. राज्यसभेच्या निवडणुकीबाबत येत्या दोन दिवसांत आपण निर्णय जाहीर करू, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची दिलेली ऑफर आणि आ. नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटच्या पार्श्वभूमीवर आज नारायण राणे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नारायण राणे विधानभवनात आल्याचे समजताच त्यांच्या या भेटीबाबत कमालीची उत्सूकता निर्माण झाली होती. या दोन नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांशी भेटून राणे परत निघाले असता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय चर्चा झाली असे विचारले असता राणे म्हणाले की, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. राज्यसभेच्या निवडणुकीबाबत काही चर्चा झाली का, असे विचारले असता राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनीच त्याबाबतचा विषय काढला. मात्र मी अद्याप माझा कोणताही निर्णय कळविलेला नाही. दोन दिवसांत याबाबत आपण निर्णय जाहीर करू, असे राणे म्हणाले.