भंडारा जिंकू “ठोकून” पालघर जिंकू “ठासून”
आशिष शेलार यांचे आव्हान
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कर्नाटकातील जनतेने भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मुंबई भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी आभार व्यक्त केले असून, आता भंडारा जिंकू “ठोकून”पालघर जिंकू “ठासून असे ट्विट करून अप्रत्यक्ष शिवसेनेला आव्हान दिले आहे.
कर्नाटकात भाजपाला मिळालेल्या यशानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार आक्रमक झाले आहेत. कर्नाटकातील यशानंतर त्यांनी ट्विट केले आहे.कर्नाटकात जिंकलो मतदारांचे आभार! आता भंडारा जिंकू “ठोकून”पालघर जिंकू “ठासून” असे ट्विट करून आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा आहे.
पालघर पोटनिवडणुकीत भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी देत भाजपला आव्हान दिल्याने भाजपाने काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी देवून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे तर भाजपाकडून हेमंतकुमार पटले निवडणुक रिंगणात आहेत. याठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत आहे. पालघरमधून शिवसेनेने माघार घ्यावी, असा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला होता.त्यामुळे शेलार यांच्या या ट्विटमुळे शिवसेना आणि भाजपातील सामना रंगण्याची चिन्हे आहेत.