युतीसाठी शिवसेनेला दोन पावले पुढे यावे लागेल

युतीसाठी शिवसेनेला दोन पावले पुढे यावे लागेल

मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी युती करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला असतानाच, भाजपाने शिवसेनेशी युती करायला कधीही नकार दिलेला नसून, युती कधीही एकतर्फी असू शकत नसल्याने आता युतीसाठी शिवसेनेलाही दोन पावले पुढे यावे लागेल, असे स्पष्ट करीत विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलावला.

पालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये युतीची चर्चा करण्यासाठी भाजपा नेहमीच तयार आहे.परंतु शिवसेनेलाच युती करायची नसेल तर पालघरमध्ये ज्या प्रमाणे लढलो तसे भविष्यात इतरत्र लढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे तसेच भंडारा-गोंदियामधील दुष्काळामुळे भाजपाचे मोठे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला. पालघरमध्ये  दिवंगत खासदार पुत्रांना भाजपाच्या विरोधात उतरवून मित्रपक्षाने कडवटपणा आणला. तो टाळला असता तर आनंदच झाला असता. यानंतर तरी सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षांनी परस्परांविरूद्ध निवडणूक लढवावी की नाही याचा विचार त्यांना करावा लागेल. आम्हा दोन्ही पक्षांची विचारधारा एकच असल्यामुळे ज्या पक्षांविरूद्ध सैद्धांतिक लढाई ते लढले त्यांच्याबरोबर शिवसेना जाईल, असे वाटत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पालघर आणि भंडा-याच्या पोटनिवडणुकीत अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे आमचे कित्येक मतदार आपल्या संवैधानिक अधिकारापासून वंचित राहिले. याचा मोठा फटका भाजपाला बसला. निवडणूक आयोगाने या घटनांची गंभीर नोंद घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले. या मशीन बिघडल्याबद्दल विरोधकांनी आम्हाला लक्ष्य केलेच पण प्रसारमाध्यमांनीही जणू आम्हीच ईव्हीएम मशीनचे उत्पादक आहोत, असे बेछूट आरोप केले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.भंडारा-गोंदियामध्ये सध्या दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कितीही मदत केली तरी तेथील लोक अस्वस्थ असतातच. या अस्वस्थतेमुळे सरकारविरूद्ध असलेली नाराजी या निवडणुकीत दिसली. हीच निवडणूक पावसाळ्यानंतर झाली असती तर चित्र वेगळे असते. हरकत नाही. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत ही जागा आम्हीच जिंकणार असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Previous articleमहाराष्ट्र एका अभ्यासू नेतृत्वाला मुकला : बापट
Next articleपालघरमध्ये भाजपचा नाही तर साम, दाम, दंड, भेदाचा विजयः खा. चव्हाण