नरेंद्र मोदींकडून जवानांच्या शौर्याचेही राजकारण : शरद पवार
मुंबई नगरी टीम
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई हल्ल्याचे आणि जवानांनी दाखवलेल्या शौर्याचेही राजकारण करण्यास सुरुवात केली अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. आज नाशिक मध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. नुकत्याच जालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने तीन राज्ये गमावली. आता जनता आपल्याला नाकारणार याची सरकारला खात्री पटू लागली असल्यानेच आता जवानांच्या शौर्याचे राजकारण केले जात आहे असे शरद पवार म्हणाले.
आज नाशिक मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, नुकताच देशातील सैनिकांवर काश्मीर खोऱ्यातील दहशवादी चळवळीत सहभागी झालेल्या युवकांनी हा हल्ला केला. त्यानंतर लष्कराला कारवाई करण्याचा अधिकार दिला असे सरकारने सांगितले. यामध्ये हवाई दलाने कारवाई करून ती आतंकवाद्यांचे स्थळे उध्वस्त केली. यामधून आम्ही भारतीय कुणाच्या वाटेला जात नाही जर आमच्या वाट्याला कोणी गेले तर आम्ही त्यांना सोडणार नाही. हा संदेश दिला गेला. देशाच्या एक्क्याचा ज्यावेळेस प्रश्न येतो तेव्हा पक्षभेद राजकारण बाजूला सोडून एकत्र येण्याची गरज असते. त्यादृष्टीने एकत्र येऊन सैनिकांना त्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक देऊन त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे जवानांनी शौर्य दाखविले हा चर्चेचा विषय नसून आपण सैन्याच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कष्ट सैनिकांनी केले आणि छाती कोण बडविते आहे अशी टीका करून राजकीय फायदा घेण्यासाठी भाजपचा डाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, मनमोहन सिंग सरकारच्या काळात राफेल ५६० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय झाला होता आणि त्याच्या दुरुस्तीचे काम एचएलला देण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र भाजपने राफेल विमान साडे पंधराशे कोटी रुपयांना खरेदी केली जात आहे आणि त्याच्या दुरुस्तीचे काम एचएएला न देता अंबानीच्या कंपनीला दिले जात आहे. एकीकडे पंतप्रधान न खाऊगा न खाणे दुगा अशी भाषा करतात मात्र या खरेदीत दाल मे कुछ काला आहे अशी टीका त्यांनी केली. संरक्षण खात्याचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी माजी पंतप्रधानावर टीका केली जात आहे. असा संकुचित विचार करणारे सरकार आज सत्तेत आहे. पुन्हा एकदा जर यांचे सरकार आले तर लोकशाही व्यवस्था मोडकळीस येऊन हुकूमशाही व्यवस्था येईल असे त्यांनी सांगितले.
राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपने देशात जी आपत्ती आणली आहे ती घालविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे त्यामुळे बूथ प्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळी ती यंत्रे तपासून घेण्याची गरज आहे. कारण ज्यांचा हातात सत्ता आहे त्यांच सरकार हातातून जात असल्याने राडीचा डाव खेळणं हा भाजपचं प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता होती ती राज्य भाजपच्या हातातून गेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा परिवर्तन होणारच असे यावेळी सांगितले.