तोडपाणीच्या पैशातून सत्कार करून घेणे विरोधी पक्षनेत्यांना शोभते का ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकावर भाजपचा पलटवार
परळी : राजकारणात प्रत्येक ठिकाणी तोडपाणी करत त्यातून आलेल्या पैशातून सत्कार करून घेणे विरोधी पक्षनेत्यांना शोभते का ? असा सवाल करून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विनाकारण टीका करणारांनी अगोदर स्वतःची लायकी तपासावी अशा शब्दांत भाजपचे युवा नेते महादेव फड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकबाजीवर पलटवार केला आहे.
आमच्या नेत्या बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी माझ्या बॅनर, हार तुरे यावर खर्च करण्यापेक्षा पाणी फाऊंडेशनला मदत करावी असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. यात कुणावरही टीका टिप्पणी केली नव्हती तरीही त्यांचे हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसला व त्यांच्या नेत्यांना झोंबण्याचे कारणच काय ? असे फड यांनी पत्रकात म्हटले आहे. विरोधी पक्षनेते आतापर्यंत तोडपाणीचे राजकारण करीत आले आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. सुतगिरणी असो की साखर कारखाना, त्याच्या नावाखाली अनेकांच्या जमिनी लाटल्या, बेरोजगार तरूणांचे संसार उघड्यावर आणले. नुकत्याच काही न्यूज चॅनलवर आणि सोशल मिडियामध्ये व्हायरल झालेल्या त्यांच्या ऑडिओ क्लिपमधून त्यांचे तोडपाणीचे राज्यातील जनतेला कळालेले आहे, याच पैशातून एखादा पुरस्कार मिळाला म्हणून सत्कार करून घेणे त्यांना कसे चालते? असा सवाल त्यांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्यांना पुरस्कार मिळाला त्यादिवशी पंकजा मुंडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांचे अभिनंदन केले होते, तसे धाडस मागील वर्षी पंकजा मुंडे यांना पुरस्कार मिळाला त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी दाखवले नाही असे महादेव फड म्हणाले.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी पाण्याचे मोठे काम केले आहे. पाणी फाऊंडेशन देखील आपल्या जिल्हयात चांगले काम करत आहे, त्यामुळे त्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आवाहन करतांना त्यांनी कुणाला टार्गेट केले नव्हते परंतु त्यांचा विरोध करण्यावरच ज्यांचे राजकारण अवलंबून आहे, त्यांना याची किंमत काय कळणार आणि जनतेलाही ते वारंवार दिसून येत असल्याचे फड यांनी पत्रकात म्हटले आहे.