मुंबई पदवीधरमधून शिवसेनेचे विलास पोतनीस विजयी

मुंबई पदवीधरमधून शिवसेनेचे विलास पोतनीस विजयी

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांना तब्बल १९ हजार ३५४ मतांनी विजय नोंदवला. या निवडणूकीत पदवीधर मतदारांनी पहिली पसंती शिवसेनेला दिल्याने भाजपच्या मतांच्या दुपटीने  मते घेत तब्बल ११ हजार ५६२ मतांची आघाडी घेत शिवसेनेने विजय मिळवित मुंबई आपलाच गड असल्याचे सिद्ध केले आहे.

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मुंबई, कोकण आणि नाशिकच्या चार जागांसाठी तब्बल ५२ उमेदवारांचे भवितव्य २५ जून रोजी मतदारांनी मतपेटीत बंद केले. नेरूळ येथील आग्रीकोळी भवन येथे आज मतमोजणी पार पडली. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत विलास पोतनीस यांना ९ हजार ६४८ मते मिळाली. या पहिल्या पसंतीच्या मतांवर तब्बल ४ हजार ७६० मतांची आघाडी पोतनीस यांनी पहिल्याच फेरीत घेतली होती. या फेरीत भाजपचे उमेदवार अॅड. अमित मेहता यांना ४ हजार ८८८ मते मिळाली. पोतनीस यांना एकूण मतदानापैकी १६ हजार ९१० मते मिळणे आवश्यक होते. मात्र दुसर्‍या फेरीअखेर त्यांनी  ११ हजार ५६२ मतांची आघाडी घेतली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. तब्बल १९ हजार ३५४ पहिल्या पसंतीची मते शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांना पडल्याने शिवसेनेने ही निवडणूक एकतर्फी जिंकली. भाजपचे उमेदवार अॅड. अमित मेहता ७ हजार ७९२ मते मिळाली. पोतनीस यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणे बाकी असतानाच शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केला.आणि शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Previous articleप्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजपची मागणी
Next articleकोकण पदवीधरमधून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी