मुंबई नगरी टीम
परळी । राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे वैद्यनाथ अर्बन बँकेवर वर्चस्व कायम राहिले आहे. मंत्री पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे तेराही उमदेवार मोठया मताधिक्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला.
वैद्यनाथ बँक संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल रिंगणात उतरले होते. या पॅनलच्या चार जागा या अगोदरच बिनविरोध निवडून आल्या आहेत, त्यात माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, अनिल तांदळे,विनोद जगतकर आणि माधुरी मेनकुदळे यांचा समावेश होता.संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या ३६ मतदान केंद्रावर शनिवारी मतदान पार पडले. एकूण ४३ हजार ९६२ मतदारसंख्येपैकी १६ हजार २८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, एकूण मतदानाची टक्केवारी ३७.५ इतकी नोंदवली गेली होती.
हे आहेत विजयी उमेदवार
आज बीड येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दुपारी सर्व तेरा जागांचे निकाल हाती आले, यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने निवडून आले. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे – विनोद सामत, प्रकाश जोशी,राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, विजय वाककेर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री, रमेश कराड.