धनगर आरक्षणावरून धनंजय मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल

धनगर आरक्षणावरून धनंजय मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपच्या मनात असत तर २०१६ मध्येच लोकसभेत ३२५ क्रमांकाचं बिल आलं त्यावेळी धनगर आरक्षण मंजुर करुन घेतलं असतं परंतु धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं केवळ निवडणुकीसाठी गाजरं दाखवण्याचं काम भाजपने केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केला.

धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न औचित्याच्या मुद्दयाद्वारे धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी सरकारच्या आश्वासनावर जोरदार हल्लाबोल केला.मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीपुर्वी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते त्याची आठवण धनंजय मुंडे यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांना करुन दिली.

आता साडे चार वर्ष उलटून गेली, शेकडो कॅबिनेट झाल्या परंतु मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही.
२०१६ मध्ये लोकसभेत ३२५ क्रमांकाचे बिल आले होते. त्या बिलाला राज्यातील १८ खासदारांनी धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करावी सुचवली होती असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

केंद्रसरकारने कलम ३४२ अंतर्गत निर्गमित केलेल्या आदिवासींच्या यादीत बदल करावा, धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करावी अशाप्रकारची शिफारस सभागृहाने करावी आणि याप्रकरणाचा ठरावही घ्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली.

राज्य सरकारला धनगर समाजाला आरक्षण देता येत नसेल तर त्यांनी एक सर्वपक्षीय ठराव मांडावा, तो एकमताने पारीत करून केंद्राकडे पाठवावा. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातींच्या सवलती देण्याचे आश्वासन दिले होते पण अद्याप सवलती दिल्या गेल्या नाही. राज्याचे महाधिवक्ता टिसच्या अहवालाचा अभ्यास करत आहे. अभ्यास झाला की आरक्षण देऊ अशी गाजरं दाखवली जात आहेत असे मुंडे म्हणाले.

धनगर आरक्षणाबाबत आमदार रामराव वडकुते,आमदार रामहरी रुपनवर यांनीही हा विषय उचलून धरला. त्यावेळी सभागृहात सरकारकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. धनगर आरक्षणप्रश्नी सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिवसभरासाठी तहकूब केले.

Previous articleवायुदलाने केलेल्या धाडसी कारवाईचे विधिमंडळात अभिनंदन
Next articleमोदींनी ५६ इंचाची छाती दाखवून दिली ;शिवसेनेकडून प्रशंसा