मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून “या” व्यक्तींची होणार नियुक्ती

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने संबंधीत ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.संबंधीत गावात सरपंचपद सध्या ज्या प्रवर्गासाठी आरक्षित होते त्याच प्रवर्गाच्या व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री मुश्रीफ केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेणे अशक्य असल्याने मुदत संपणाऱ्या व यापूर्वी मुदत संपलेल्या आणि सद्यस्थितीत ज्या ग्रामपचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त आहेत अशा ग्रामपंचायतीवर  जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन स्तरावरील अधिकार प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या नियुक्त्या संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करण्यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने १३ जुलै रोजी जारी केला आहे.या निर्णायाला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध करीत ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेला आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यातील १९ जिल्ह्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून  दरम्यान समाप्त झाली असून १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधी दरम्यान समाप्त होत आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर संबंधीत अध्यादेशान्वये प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.संबंधीत गावात सरपंचपद सध्या ज्या प्रवर्गासाठी आरक्षित होते त्याच प्रवर्गाच्या व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री मुश्रीफ केली आहे.ज्या गावचे सरपंचपद ज्या वर्गासाठी आरक्षित होते. म्हणजेच अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरीकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण इत्यादी वर्गासाठी आरक्षित होते त्याच प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्यात यावी. त्यामुळे त्या घटकावर अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्राद्वारे कळविले असल्याने प्रशासक म्हणून राजकीय व्यक्तींची नेमणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सद्यस्थितीत यापूर्वी मुदत संपलेल्या ज्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त आहेत अशा अधिकाऱ्यांची कोरोनाच्या कामांसाठी आवश्यकता असल्याने त्यांच्या नियुक्त्या रद्द करुन त्या ग्रामपंचायतीवर सुध्दा ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तिची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरु राहील याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.यासंदर्भातील शासन स्तरावरील अधिकार प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या नियुक्त्या संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करावयाच्या आहेत, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

२०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १०, २५ जून, २०२० अन्वये नैसर्गिक आपत्ती किंवा आणिबाणी किंवा युध्द किंवा वित्तीय आणिबाणी किंवा प्रशासकिय अडचणी किंवा महामारी यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य झाले नसेल तर राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेव्दारे अशा पंचायतीचा प्रशासक म्हणुन योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १५१ मधील पोटकलम १ मध्ये खंड (क) मध्ये तरतुद करण्यात आली आहे असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Previous articleHSC RESULT: बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार
Next articleमास्क,सॅनिटायजरच्या दर निश्चितीसाठी समिती गठीत