चक्क रोहित पवारांनी केले कंगनाचे अभिनंदन, काय कारण आहे वाचा!

मुंबई नगरी टीम

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच या ना त्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. या नवीन वर्षातही तिची वायफळ टिवटिव काही कमी झालेली दिसत नाही. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका करताना केलेले विधान आता कंगनावरच उलटल्याचे दिसत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत चक्क कंगनाचेच अभिनंदन केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

उर्मिला यांच्यावर केलेली टीका कंगनाच्याच विरोधात उलटल्याचे दिसत आहे. यावरूनच रोहित पवार यांनीही तिच्यावर निशाणा साधला आहे. “भाजपला खुश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही भाजपचा मुखवटा टरकावत खरा चेहरा समोर आणला आहे. यासाठी कंगना रणावतचे अभिनंदन करायला पाहिजे. या द्रोहाबद्दल भाजपला काय शिक्षा द्यायची हे आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल”, असे रोहित पवार यांनी म्हटले.

कंगनाचे ट्विट काय ?

“प्रिय उर्मिला मातोंडकर जी, मी जे माझ्या मेहनतीने घर बांधले ते सुद्धा काँग्रेस तोडत आहे. खरेच भाजपला खुश करून माझ्या हातात केवळ २५-३० केसेसच आल्या आहेत. मी पण तुमच्यासारखी समजूतदार असती तर काँग्रेसला खुश केले असते. किती मूर्ख होते मी, हो ना?”, असे ट्विट कंगनाने केले आहे. कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून अनेकांनी तिची खिल्लीही उडवली.

नेमकं प्रकरण काय ?

त्याचे झाले असे की, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी तब्बल तीन कोटीचे एक आलिशान ऑफिस खरेदी केल्याचे वृत्त रविवारी दिवसभर माध्यमांत झळकले. त्यामुळे उर्मिला यांच्या या ऑफिसची चर्चा राजकारणापासून सर्वत्रच रंगलेली पाहायला मिळाली. हीच संधी साधत कंगनाने उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका करत काँग्रेसवरही निशाणा साधला. दरम्यान, आपल्याबद्दल प्रसिद्ध करण्यात आलेली बातमी ही चुकीची आहे, असे उर्मिला यांनी सांगितले. आपला अंधेरीतील फ्लॅट विकून त्या पैशाने आपण हे ऑफिस खरेदी केल्याचे त्यांनी स्पष्ट करत टीकाकारांना चपराक लगावली.

Previous articleबाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार ? प्रदेशाध्यक्षपदासाठी ‘या’नावांची चर्चा
Next articleएमआयएम,वंचित’वर ईडी का लागत नाही ? एकनाथ गायकवाड यांचा सवाल