संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत भन्नाट डान्स;समाज माध्यमांमध्ये तुफान व्हायरल

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा विवाह उद्या सोमवारी होत असून,या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी वधूपिता खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत केलेल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या डान्सचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे उद्या सोमवारी विवाहबंधनात अडकत आहे.विवाहाच्या निमित्ताने रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला संजय राऊत,राजेश नार्वेकर यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचेही कुटुंब हजर होते.लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी ठेका धरला.त्यावेळी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ आज समाज माध्यमांत चांगलाच व्हायरल झाला आहे. संजय राऊत यांच्यासोबतच्या डान्सनंतर सुप्रिया सुळे यांनी वधूमाय वर्षा राऊत यांनाही डान्स करण्याचा आग्रह धरला.सुप्रिया सुळे यांच्या आग्रहामुळे लाजऱ्या-बुजऱ्या वर्षा राऊत यांनी संजय राऊत यांच्यासोबत डान्स केला.त्यावेळी टाळ्या वाजवत उपस्थितांनी दोघांच्या या डान्सची तारीफ केली.या संगीत कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनीही काही गाणी सादर केली. त्यावेळी राऊत परिवार काहीसे भावूक झाले होते.

Previous articleकाही मंत्र्यांचे व सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचे घोटाळे उजेडात आणणार
Next articleलॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा