शक्तीप्रदर्शनात काकांपेक्षा पुतण्याच ठरला सरस ! कोणत्या गटाकडे किती आमदार ? खरा आकडा आला समोर

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडाचा झेंडा फडकवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.अजित पवार यांची ही कृती पक्षविरोधी असल्याचे सांगत शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह ९ जणांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन केले होते. बैठकीत दोन्ही गटाकडे विधानसभेतील किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार असल्याने या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.या शक्तीप्रदर्शनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी अजित पवार यांच्याकडे ३३ आमदार तर शरद पवार यांच्याकडे १८ आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.काही आमदार आजारी तर काही परदेशात असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत असे स्पष्टीकरण अजित पवार गटाकडून देण्यात आले.

पक्षातील बंडाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटाने बैठकीचे आयोजन केले होते.शरद पवार यांच्या गटाची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली.या बैठकीसाठी खासदार,आमदार यांना निमंत्रित करण्यात आले होते.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले ९ आमदार वगळता सर्व आमदार सोबत असल्याचा दावा केला होता.मात्र त्यांचा हा दावा आज फोल ठरला असल्याचे आजच्या बैठकीवरून स्पष्ट झाले. शरद पवार गटाच्या आज झालेल्या बैठकीला विधानसभेतील १७ आमदार,विधान परिषदेतील ३ आमदार तर लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून पाच खासदार उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्रे येथील मुंबई एजुकेशन ट्रस्टच्या सभागृहात पार पडली.या बैठकीला विधानसभेतील ३२ आमदारांसह,विधान परिषदेतील रामराजे नाईक निंबाळकर,अमोल मिटकरी, विक्रम काळे हे आमदार तर संसदेतील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे खासदार उपस्थित होते. याशिवाय बैठकीत राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि आमदार सहभागी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील आजच्या शक्तिप्रदर्शनात अजित पवार सरस ठरल्याचे चित्र दिसले.

शरद पवार यांना पाठिंबा दिलेले आमदार

जयंत पाटील (इस्लामपूर), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा- कळवा), अनिल देशमुख (काटोल ), बाळासाहेब पाटील (उत्तर कराड), राजेश टोपे (घनसावंगी), राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा), अशोक पवार (शिरूर) मकरंद पाटील (वाई ), प्राजक्त तनपुरे( राहुरी), चेतन तुपे (हडपसर), चंद्रकांत नवघरे (बसमत ), रोहित पवार (कर्जत जामखेड),सुमन पाटील (तासगाव कवठेमहांकाळ) सुनील भुसारा (विक्रमगड), किरण लहामटे (अकोले), संदीप क्षीरसागर(बीड), मानसिंग नाईक (शिराळा), दौलत दरोडा ( शहापूर) तर या पैकी मकरंद पाटील,चंद्रकांत नवघरे आणि दौलत दरोडा बैठकीला उपस्थित नव्हते.

विधान परिषद सदस्य: एकनाथ खडसे, बाबाजान दुराणी, शशिकांत शिंदे
खासदार : श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान

अजित पवार यांना पाठिंबा असलेले आमदार

छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील(आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी) आदिती तटकरे (श्रीवर्धन), धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), संजय बनसोडे (उदगीर), अनिल पाटील (अमळनेर),बाळासाहेब आजबे (आष्टी),राजू कारेमोरे (तुमसर),आशुतोष काळे (कोपरगाव), माणिकराव कोकाटे (सिन्नर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव) दिपक चव्हाण (फलटण), संग्राम जगताप (अहमदनगर शहर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), इंद्रनील नाईक (पुसद), शेखर निकम (चिपळूण), नितीन पवार (कळवण),बाळासाहेब पाटील (अहमदपूर),राजेश पाटील (चंदगड),दिलीप बनकर (निफाड),अण्णा बनसोडे (पिंपरी) अतुल बेनके (जुन्नर), दत्तात्रय भरणे (इंदापूर), यशवंत माने (मोहोळ), दिलीप मोहिते (खेड आळंदी), नीलेश लंके (पारनेर) बबनराव शिंदे (म्हाडा),सुनील शेळके (मावळ), प्रकाश सोळंके (माजलगाव) अपक्ष देवेंद्र भुयार (मोर्शी)
लोकसभा आणि राज्यसभा सदस्य : सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल
तटस्थ भूमिका घेतलेले आमदार: सरोज अहिरे

Previous articleसाहेब…तुम्ही आवाज द्या,बडव्याना बाजूला करा,सत्तेत राहून जनेतेचे प्रश्न सोडवू
Next articleएकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी राहणार, शिंदेच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवणार