काँग्रेस राष्ट्रवादीचे हे नेते आज भाजपात प्रवेश करणार

काँग्रेस राष्ट्रवादीचे हे नेते आज भाजपात प्रवेश करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादीतील गळती सुरू असून, भाजपची तिसरी मेगाभरती आज पार पडणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले अनेक बडे नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.आज गरवारे क्लब येथे दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील प्रमुख नेते भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. यापूर्वी झालेल्या दोन मेगा भरतीत राज्यातील दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाची ताकद कमी झालेली असतानाच आज बुधवारी भाजपाची तिसरी मेगाभरती गरवारे क्लब येथे दुपारी ३ वाजता होणार आहे.राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील दिग्गज नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. सोलापूर येथे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह,राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Previous articleएमआयएमच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Next articleअभय योजना २०१९ अंतर्गत ३ हजार ५०० कोटींचा कर भरणा