अपक्ष आमदारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

अपक्ष आमदारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तप्त असतानाच शेतक-यांविषयी कळवळा असलेल्या अपक्ष आमदारांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसनेने आक्रमक भूमिका घ्यावी अशी मागणी केली.

राज्यात अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल आणि साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळी गावित यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणे संदर्भात शिवसेनेने आक्रमक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच ओला दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना सरसकट २५ हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी अशी मागणी या आमदारांनी यावेळी केली. ओला दुष्काळग्रस्त शेतक-यांना केवळ शिवसेनाच मदत मिळवून देऊ शकते असेही आ. बच्चू कडू म्हणाले.

Previous articleभाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण द्यावे : आठवलेंची मागणी
Next articleशिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर