ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीसांनी गाऊ नये,ऑनलाईन याचिका तयार

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात.मग ती गोष्ट राजकीय असो किंवा त्यांचे गाणे असो यावरून त्या नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत आल्या आहेत.मात्र आपले आणखी एक गाणे येत असून त्यावरही ट्रोलिंग करा.सर्वांचे स्वागत, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सना एकाप्रकारे आव्हानच दिले आहे. हे आव्हान आता ट्रोलर्सनी देखील गांभीर्याने घेतले असल्याचे दिसत आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाणे प्रदर्शित करू नये, अशी मागणी करणारी ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ४०० हून अधिक जणांनी या याचिकेला समर्थन दिले आहे.

चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर ही याचिका तयार करण्यात आली आहे. अमृता यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये त्यांनी एका सस्पेन्स चित्रपटातील मी गायलेले एक गाणे येत्या गुरुवारी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले. हे प्रमोशनल गाणे असून चित्रपटातही ते असणार आहे. हे गाणे एन्जॉय करा, ट्रोल करा, असे त्यांनी म्हटले. त्यानुसार चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर एका युजरने सोमवारी ही ऑनलाईन याचिका तयार केली. ज्यामध्ये पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये.अशी मागणी करण्यात आली आहे.

या याचिकेच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील एक मथळा लिहण्यात आला आहे. “पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनीप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करून नये, यासाठी आपण पीटिशन साइन करणे गरजेचे आहे”, असे लिहण्यात आले असून, ‘आपला कान आपली जबाबदारी’, अशी मिश्किल टिप्पणी करण्यात आली आहे. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असतात. राजकारणात नसतानाही त्या अनेकदा या निगडित विषयांवर आणि नेत्यांवर टिप्पणी करताना दिसतात. त्यामुळे नेटकऱ्यांकडून त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. शिवाय त्यांना त्यांच्या गाण्यावरूनही अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Previous articleमोठी बातमी : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर होणार सरपंचपदाची सोडत
Next articleकोविडमुळे संसदेचे अधिवेशनच रद्द करणाऱ्या मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ?