गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी:यंदाही सार्वजनिक मंडळांची मूर्ती ४ फूटांची असणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील सध्याची कोरोना रूग्णांची संख्या पाहता आणि तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेवून या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून,घरगुती गणेशमूर्ती २ फूटांची तर सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूटांची गणेशमूर्ती असणे बंधनकारक करण्यात आले आहे.गृहविभागाने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक मंडळांकरिता आणि घरगुती मूर्तीवर बंधने घालण्यात आले आहेत.त्यानुसार सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फुटांची,तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.ब्रेक दि चेनच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधपातळीबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहणार आहेत.त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही असेही या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी असेही या मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूटांची श्रीगणेशाची मूर्ती तर घरगुती श्रीगणेशाची मूर्ती २ फूटांच्या मर्यादेत असावी अशी मर्यादा घालण्यात आली आहे. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू,संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे.मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करण्यात यावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.उत्सवाकरिता वर्गणी,देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असेही बंधने घालण्यात आली आहेत.सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम,शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी असे या सूचनांमध्ये म्हटले आहे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील,इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.महापालिका, विविध मंडळे,गृहनिर्माण संस्था,लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी,असेही गृहविभागाने स्पष्ट केले आहे.

Previous articleवाचा : लोकल प्रवासासाठी ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल’ पास कसा काढायचा ?
Next articleमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा : ‘या’ विद्यार्थ्यांचे पदवी,पदव्युत्तर पर्यंतचे पुर्ण शुल्क माफ