काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटण्यासाठी सायकलने राजभवनावर जाणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. आजही सीएनजी व पाईप गॅसचे दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस पक्ष या महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत असून उद्या गुरुवारी राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. जगणे मुश्कील केलेल्या या सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. ७ जुलैपासून राज्यात विविध आंदोलने करून मोदी सरकारच्या या अन्यायी महागाईविरोधात आवाज उठवला आहे. उद्या हँगिंग गार्डनपासून राजभवन पर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहे.जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेल्या मोदी सरकारने जागे होऊन जनतेला दिलासा द्यावा यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे,असे पटोले म्हणाले.

पटोले यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बदलापूरचे विठ्ठल किणीकर, सुरेश पाटील, मनिषा पोळ, समर्थ लाड, अविनाश पाटील, रोहितकुमार प्रजापती, अनिता प्रजापती, रुपेश अंबेरकर, रतन कांबळे, मनिषा कांबळे, साक्षी दिवेकर, मिरजा आंबेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी टिळक भवन, दादर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Previous articleआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
Next articleदहावीचा निकाल उद्या ‘या’ वेबसाईटवर बघा आणि निकालाची प्रिंटआऊट काढा !