बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वीय सहायकाने मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत केला शिंदे गटात प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिंदे गटाने शिवसेनेतील अनेक नेत्यांना आपल्या गटात सामील करण्याचा सपाटा लावला आहे.दिवंगत शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जाणारे आणि त्यांचे स्वीय सहायक राहिलेले चंपासिंह थापा आणि मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजे यांनी आज ठाणे टेंभीनाका येथील अंबे मातेच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करीत शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत कायम सावली प्रमाणे राहणारे आणि त्यांचे स्वीय सहायक राहिलेले चंपासिंह थापा यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.चंपासिंह थापा यांच्यासह मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती पुढे घेऊन जात आहे अशा व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी या दोघांनी सांगितले.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाप्रमुख शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना विस्तारक राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleप्रकल्पासाठी राखून ठेवलेली जागा दाखवा आणि मगच आंदोलन करा
Next articleवेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात महाविकास आघाडीचे केवळ नाटक