वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात महाविकास आघाडीचे केवळ नाटक

मुंबई नगरी टीम

मुंबई । वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे उभारण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली नव्हती.या प्रकल्पासाठी त्यांनी जागाही दाखवली नव्हती.आम्ही मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये पॅकेजला मंजूरी देवून त्यांना या प्रकल्पासाठी जागा दाखवली.त्यामुळे या प्रकरणी महाविकास आघाडीची केवळ नौटंकी सुरू असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात

कोणताही करार झालेला नव्हता आणि कंपनीला त्या प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता असे स्पष्ट करणारा कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाला आहे.त्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात तत्कालीन महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही निर्णय घेतला नव्हता.या प्रकल्पासाठी त्यांनी जागाही दाखवली नव्हती.गुजरातला हा प्रकल्प चालला तेव्हा आम्ही त्यांना भेटलो. मंत्रिमंडळाच्या उपसमितीत पॅकेजला मंजूरी देवून त्यांना जागा दाखवली हे सर्व आमच्या काळात झाल्याने महाविकास आघाडीने काहीच नाही केवळ नौटंकी करण्याचे काम केले अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. सध्या राज्यातील कारागृहात जामीन मंजूर झालेले एकूण १ हजार ६४१ कैदी असून,त्यांच्या जामीनासाठी बॅाण्ड भरण्यासाठी पैसे नाहीत.अशा कैद्यांना बाहेर काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यासंदर्भात सूचना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई मध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुस-या टप्प्याची कार्यवाही सुरु आहे.या प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला गती देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यामध्ये सध्या २०१९ मधील ५ हजार २९७ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे.२०२० मधील ७ हजार २३१ पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरु आहे.याबरोबरच २०२१ अखेर रिक्त होणाऱ्या १० हजार पदांची मागणी पोलीस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या १० हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली.राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी गृह विभागाने आणि पोलिसांनी अधिक सतर्कतेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांनी दिले.

Previous articleबाळासाहेब ठाकरे यांच्या स्वीय सहायकाने मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत केला शिंदे गटात प्रवेश
Next articleतानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा; विरोधक आक्रमक