विधानभवनात मना सारखं केबिन न मिळाल्याने ‘कॅबिनेट’ मंत्र्याने टाकलाय कार्यालयावर बहिष्कार !

मुंबई नगरी टीम

मुंबई । सध्या सुरू असलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ४ ऑगस्ट रोजी संपत आहे.मात्र गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या अधिवेशन कालावधीत महायुती सरकार मधिल एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यांने आपल्याला मना सारखं आणि ज्येष्ठता व राजशिष्टाचारानुसार दालन न मिळाल्याने चक्क देण्यात आलेल्या दालनावर बहिष्कार टाकत या दालनात पाय न ठेवल्याची बाब समोर आली आहे.अधिवेशन कालावधीत या कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिका-यांनी आपले कामकाज चक्क मंत्रालयातून केले आहे.

प्रत्येक अधिवेशनात आपल्या न्याय हक्कासाठी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार कामकाजावर बहिष्कार घालतात.राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होवून दोन आठवड्याचा कालावधी उलटून गेला आहे. सध्या सुरू असणा-या पावसाळी अधिवेशनाची सांगता येत्या ४ ऑगस्टला होणार आहे.मात्र या कालावधीत शिंदे- फडणवीस- पवार या महायुतीच्या सरकार मधिल एका कॅबिनेट मंत्र्यांनी विधानभवनात आपल्याला मना सारखं आणि ज्येष्ठता व राजशिष्टाचारानुसार दालन न मिळाल्याने चक्क देण्यात आलेल्या दालनावर बहिष्कार टाकल्याची बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे या मंत्री महोदयांनी अधिवेशन काळात त्यांना देण्यात आलेल्या दालनात पाय ठेवला नसल्याचे समोर आले आहे.राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे राज्य मंत्रिमंडळातील एक जेष्ठ मंत्री असून, १९९५ च्या शिवसेना- भाजपा युतीच्या सरकारमध्ये गावित हे राज्यमंत्री होते. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्येही डॉ. गावित यांनी आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण, पर्यटन, रोजगार हमी, फलोत्पादन, मराठी भाषा आदी विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे.सध्याच्या महायुती सरकारमध्ये गावित यांच्याकडे महत्वाचे आदिवासी विकास खाते आहे.आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित असे आपल्याच दालनावर बहिष्कार टाकलेल्या मंत्र्यांचे नाव आहे.

गेल्या दोन अधिवेशनात विधानमंडळ सचिवालयाने डॉ.विजयकुमार गावित यांना त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन राजशिष्टाचारानुसार जेष्ठ मंत्र्यांच्या रांगेतील विधिमंडळातील तळ मजल्यावरील २५ क्रमाकांचे दालन वितरित केले होते.मात्र तीन आठवड्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत ९ मंत्र्यांनी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.यानंतर पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याने विधिमंडळ प्रशासनाने या नव्या मंत्र्यांना दालने उपलब्ध करून दिली.राष्ट्रवादीचे बहुंताश मंत्री हे ज्येष्ठ असल्याने त्यांना सामावून घेण्याकरिता गावित यांचे दालन त्यांना न विचारता दुसऱ्या एका ज्येष्ठ मंत्र्यांला वितरित केले.विधानमंडळ प्रशासनाने आपल्याला पूर्वी वितरित केलेले दालन कोणतीही विचारणा न करता परस्पर दुसऱ्या मंत्र्याला दिल्याने गावित विधानमंडळ प्रशासनावर नाराज झाले. सोबतच, नवख्या मंत्र्यांसोबत पहिल्या मजल्यावर दालन दिल्याने गावित यांनी संबंधित दालनातच न जाण्याचा निर्णय घेतला.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे डॉ. गावित यांनी लेखी तक्रारही केल्याचे समजते.मात्र त्यांची अध्यक्ष नार्वेकर यांनी दखल घेतली नाही.परिणामी नाराज झालेल्या मंत्री गावित यांनी पहिल्या मजल्यावर न विचारता दिलेल्या १३० क्रमांकाच्या दालनावर बहिष्कारच टाकला.अधिवेशनाचे दोन आठवडे पूर्ण झाले असले तरी गावित एकदाही या दालनाकडे फिरकले नाहीत. सध्या गावित हे राष्ट्रवादीचे आमदार व उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात तात्पुरत्या स्वरुपात बसत आहेत. तर त्यांचे कर्मचारी कधी मंत्रालयात तर कधी इतर सहकाऱ्यांकडे बसत आहेत. विधानमंडळ सचिवालयाने केलेली गफलत आणि मंत्री गावित यांनी घेतलेला पवित्रा सध्या विधिमंडळात चर्चेचा विषय ठरत आहे.

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराबाबत विधानमंडळ दालन वाटप करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, मंत्री गावीत यांच्या खासगी सचिवाने याबाबत खबरदारी घ्यायला हवी होती.यात आमचा दोष नाही असे सांगत संबंधित अधिकाऱ्यांने हात झटकले .अधिवेशन सुरु होण्यापूर्वी आपल्या मंत्र्यांना कोणते दालन हवे आहे याबाबत संबंधित मंत्री महोदयांच्या खाजगी सचिवाने पत्र दिले असते तर त्यांना योग्य ते दालन वाटप केले असते. दरम्यान, गावित यांना वाटप केलेले दालन न विचारता काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे नव्या दालनासाठी पत्र देण्याचा प्रश्नच नव्हता, असे मंत्री गावित यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Previous articleमुख्यमंत्री सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत ; भर पावसात स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व
Next articleसंग्राम थोपटे नव्हे तर विजय वडेट्टीवार होणार विरोधी पक्षनेते ; नाना पटोले गैरहजर