विस्तार आणि खातेवाटप केव्हा होणार ? अजितदादा गटाच्या नेत्याने सांगितली वेळ आणि वार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेवून १० दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे.येत्या सोमवारपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असले तरी लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या इच्छूकांचा जीव टांगणीला लागला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अनेक बैठका पार पडल्या तरी खातेवाटप आणि विस्तार यावर तोडगा निघाला नसल्याने तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट दिल्ली गाठली असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट ) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी विस्ताराचा वार आणि वेळ सांगितली आहे.

येत्या सोमवारपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून,त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार,खातेवाटप आणि पालकमंत्री यांची घोषणा होणे अपेक्षित असतानाही काही खात्यावरून विस्तार रखडलेला आहे.खातेवाटपाचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अनेक बैठका झाल्या मात्र त्यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही.राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेवून १० दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप खातेवाटप झालेले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महत्वाच्या खात्यांसाठी आग्रह धरला आहे.मात्र शिवसेनेच्या ( शिंदे गट ) आमदारांचा त्याला तीव्र विरोध आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थखात्यासाठी आग्रही आहेत.महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असताना त्यांच्याकडून निधी वाटपात भेदभाव करण्यात आला होता,असा आरोप शिवसेना आमदारांचा आहे.शिवाय राष्ट्रवादीला रायगडचे पालकमंत्रीपद देण्यासही शिवसेनेने विरोध केला आहे. याचा तिढा सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले आहेत.भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या दरबारी यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

एकीकडे राज्यात जोरदार राजकीय हालचालींना जोर आला असतानाच रखडलेला विस्तार आणि खातेवाटपावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.आम्ही तिन्ही पक्षांनी एकसंघाने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे.खातेवाटपाला वेळे लागू शकतो मात्र आमच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा समज-गैरसमज न राहता स्पष्टपणाची भूमिका घेऊन एका ताकदीने पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार,पालकमंत्री याबाबतचा निर्णय उद्या गुरूवारी संध्याकाळपर्यंत झालेला असेल अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

Previous articleशिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरू शकतात ! उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याने खळबळ
Next articleभ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू : नाना पटोलेंचा इशारा