मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं….आ.रोहित पवारांचा छगन भुजबळांवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । काल बीड मध्ये झालेल्या सभेत अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.भुजबळ आणि मुंडे यांनी केलेल्या या टीकेचा समाचार आ. रोहित पवार यांनी घेतला आहे.या सभेत शरद पवार यांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं अशा शब्दात रोहित पवार यांनी ट्विट करीत निशाणा साधला आहे.

अजित पवार यांच्या गटाने काल बीड मध्ये सभा घेत मोठे शक्तीप्रदर्शन केले.या सभेत छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष मी झालो. तुम्ही आणि मी महाराष्ट्रात दोघेच फिरत होतो. थोडे आमदार कमी पडले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री, तर मी उपमुख्यमंत्री झालो. पण, मला एक कळलं नाही. २३ डिसेंबर २००३ साली माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा तुम्ही घेतला. माझी काय चूक होती ? तेलगीला अटक करत त्याच्यावर मोक्का लावण्याचे आदेश मी दिले.तेव्हा तुम्ही मला बोलावलं आणि राजीनामा देण्यास सांगितलं. झी टीव्हीच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे.राजीनामा द्या, असं तुम्ही म्हटलं. नंतर गोयल यांचा तुम्हाला फोन आला, भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही असे त्यांनी सांगूनही तुम्ही माझा राजीनामा घेतला. १९९२-९३ आणि ९४ साली खैरनार यांनी तुमच्यावरही आरोप केले होते. तुमचा राजीनामा कोणी मागितला नाही. मग माझा राजीनामा का घेतला ? असा संतप्त सवाल भुजबळांनी शरद पवारांना कालच्या बीडच्या सभेत विचारला.

भुजबळ आणि मुंडे यांनी केलेल्या टीकेचा समाचार आ.रोहित पवार यांनी घेत ट्विट केले आहे.बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेंव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेंव्हा भाजपाची आरती गायली गेली तेंव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या, यातच सर्व आलं.कारण बारामती असो किंवा बीड संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं असे आ.रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Previous articleतटकरेंच्या एका निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार विरूद्ध अजित पवार यांच्यात ‘सामना’ रंगणार
Next articleमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी