बोरवणकरांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा ! तोपर्यंत अजितदादांना पदावरून दूर करा

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे.मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत अजित पवार यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना पटोले म्हणाले की, मीरा बोरवणकर यांनी येरवड्याची पोलीस विभागाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा तत्कालीन पालकमंत्र्यांचा प्रयत्न होता हा जो आरोप केला आहे, त्यावर सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारणाच आहेत. पण चौकशी करा अशी मागणी केली तर सरकारच सरकारची चौकशी कशी करणार? या प्रकरणात ‘दाल में कुछ काला है’, असे नाहीतर सर्व डाळच काळी आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जवळचा बिल्डर शाहीद बलवा याला सरकारी जमीन द्यावी म्हणून आपल्यावर कसा दबाव आणला हे बोरवणकर यांनी पुस्तकात लिहिले होतेच पण आज पत्रकार परिषद घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करत गंभीर आरोप केले आहेत. सरकारमध्ये जर काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फतच या प्रकरणी चौकशी केली पाहिजे तरच सर्व सत्य बाहेर येईल, असेही पटोले म्हणाले.

Previous articleमी येत आहे, आपल्या दसऱ्यासाठी ! आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोल्लंघनाला! टीझर जारी
Next articleभाजपने मराठा ओबीसी धनगर समाजाची फसवणूक केली