पार्थ पवार आणि बाबा सिद्दीकींना डावलले ….अजित पवारांकडून थेट प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी

मुंबई नगरी टीम

मुंबई । काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह लिंगायत समाजाचे नेते अजित गोपछडे यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना तर शिवसेनेकडून ( शिंदे गट ) मिलिंद देवरांना संधी देण्यात आली आहे.तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.या निवडणुकीत भाजपने चौथा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि बाबा सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा होती पण प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून १५ फेब्रुवारी उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारिख असल्याने सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.काँग्रेसचा राजीनामा देवून कालच भाजपात प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरूडच्या माजी आमदार आणि गेल्या विधानसभा निवडणूकीतउमेदवारी नाकारलेल्या मेधा कुलकर्णी यांच्यासह विधानपरिषद निवडणूकीतून माघार घेतलेले लिंगायत समाजाचे नेते आणि वैद्यकीय सेलचे अजित गोपछडे यांना भाजपाकडून संधी देण्यात आली आहे.शिवसेना शिंदे गटाकडून काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी केंद्रीयमंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा सामना करावे लागलेले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.राष्ट्रवादीने ( अजित पवार गट ) पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.पटेल यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने चौथा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार उद्या गुरूवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देणा-यांना राज्यसभेची लॉटरी

गेल्या महिन्यात काँग्रेसमधून शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे.माजी केंद्रीयमंत्री मिलिंद देवरा देवरा यांना दक्षिण मुंबईतून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा होती.२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (ठाकरे) अरविंद सावंत यांनी सलग दोन वेळा पराभव केला होता.काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केलेल्या देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल भाजपात जाहीर प्रवेश केल्यानंतर त्यांना आज राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आयारामांना उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते वंचितच- नाना पटोले.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजपा हा हवा भरलेला फुगा आहे तो कधीही फुटू शकतो हे दिसते. आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिलेला आहे. पक्ष वाढवण्यासाठी जे कार्यकर्ते आयुष्यभर मेहनत करतात त्यांना भाजपा संधी देत नाही.असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे.

पार्थ पवार आणि बाबा सिद्दीकी यांना डावलून पटेलांना उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गेल्याच आठवड्यात काँग्रेसमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केले बाबा सिद्दीकी यांना उमेदवारी देणार अशी चर्चा होती.सिद्दीकी यांच्या नावासह अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा होती.मात्र बाबा सिद्दीकी आणि पार्थ पवार यांना डावलून राष्ट्रवादीने ( अजित पवार गटाने ) पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पटेल हे सध्या राज्यसभेचे सदस्य असून त्यांची मुदत संपण्यास अजून ४ वर्ष बाकी आहेत.प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) कडून २०२२ ला राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे.पटेल हे शरद पवार गटाकडून राज्यसभेवर गेल्याने पक्षांतर बंदी कायद्याचा तांत्रिक अडसर येवू नये म्हणून पटेल हे राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत.

Previous articleअशोक चव्हाण डरपोक त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला
Next articleमराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी २० तारखेला विशेष अधिवेशन