भाजपने मराठा ओबीसी धनगर समाजाची फसवणूक केली

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात सध्या मराठा, ओबीसी,धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भाजपने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे.केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही त्यांनी कोणत्याच समाजाला आरक्षण दिलेले नाही,त्यांनी या समाजाची फसवणूक केली आहे.आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे अशी मागणी करतानाच,काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करण्यात येईल व आरक्षणचा प्रश्नही मार्गी लावेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

राज्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे पाप भाजपा करत आहे.ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये सांगतात व तेच फडणवीस मराठा भाजपाचे आरक्षण मीच देऊ शकतो अशी वल्गणा करतात पण प्रत्यक्षात दोन्ही समाजाची ते दिशाभूल करत आहेत. आरक्षणचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर केंद्र सरकार तातडीने करु शकते. जातनिहाय जनगणना हा त्यावरील महत्वाचा मार्ग आहे पण भाजपाचा जातनिहाय जनगणनेस विरोध आहे.काँग्रेस पक्ष, मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केलेली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासनही दिलेले आहे.

राज्यातील अनेक भागात कमी पाऊस पडलेला आहे, मारठवाड्यातील परिस्थितीही गंभीर आहे, ७ तारखेपासून महाराष्ट्राचा दौरा करुन आम्ही परिस्थिती पाहिली, लोकांशी संवाद साधला. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यासह अनेक प्रश्न आहेत. शेतकरी, कामगार, सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत, सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे पण सरकारला त्याचे काहीच गांभिर्य नाही. दोन-तीन कॅबिनेट मिटिंग झाल्या पण त्यात दुष्काळावर चर्चा सुद्धा झाली नाही. या येड्याच्या सरकारला जनतेचे काहीही देणेघेणे नाही. एक मंत्री सत्कार करुन घेण्यात मग्न आहेत तर दुसरे मंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आणतो म्हणून जनतेच्या पैशावर लंडन पर्यटन करुन आले व स्वतःचाच सत्कार करुन घेत फिरत आहेत.माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात, येरवड्याच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत तत्कालीन पालकमंत्री दादा यांचा त्यासाठी दबाव होता असा उल्लेख केला आहे. बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री दादा कोण ? हे जनतेला कळाले पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली.

Previous articleबोरवणकरांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा ! तोपर्यंत अजितदादांना पदावरून दूर करा
Next articleठाकरे गटाची कार्यकारिणी जाहीर ; रवींद्र वायकर,सुनील प्रभू ,अनिल परब यांची नेतेपदी नियुक्ती