काँग्रेस आघाडीवर खापर फोडून महायुती सरकारकडून अपयश झाकण्याचा प्रयत्न

मुंबई नगरी टीम

मुंबई । कंत्राटी भरतीचा निर्णय हा काँग्रेसच्या काळात घेतला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.तर काँग्रेस आघाडी सरकारने कधीही कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही,असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले आहे.काँग्रेस आघाडी सरकारवर खापर फोडून राज्यातील महायुतीचे सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करते आहे असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

कंत्राटीभरतीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात कार्यकारी पदांवर कंत्राटीभरती झाली नव्हती. आता मात्र तहसीलदार,नायब तहसीलदार, पोलीस अशा पदांवर सुद्धा कंत्राटीभरतीचा प्रयत्न झाला आहे. काँग्रेस आघाडी सरकारवर खापर फोडून राज्य सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करते आहे. आज राज्य आर्थिक अडचणीत असताना काही तरी जुने संदर्भ काढून टीका करण्यापेक्षा राज्य सरकारने प्रशासकीय बाबींवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.राज्य सरकारने कंत्राटीभरती रद्द करण्याबाबत घेतलेला निर्णय हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विजय आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे राज्य सरकारला झुकावे लागले आणि कंत्राटीभरतीचा शासननिर्णय रद्द करावा लागला, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

Previous articleदेवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनाच उघडे पाडले
Next articleकंत्राटी भरतीतून काही नेत्यांना फायदा होणार होता : विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट