कंत्राटी भरतीतून काही नेत्यांना फायदा होणार होता : विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम

मुंबई । चुकीच्या धोरणांमुळे कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली असून,काही कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला होता अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.सरकार नमले असून सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.

काही नेत्यांना कंत्राटी भरतीतून फायदा होणार होता,ते समोर आणले म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. कंत्राटी भरती फक्त वर्ग क आणि वर्ग ड च्याच जागांसाठी करण्यात यावी,असा आघाडी सरकारचा निर्णय होता,मात्र सध्याचे सरकार हे तहसीलदार सारखी महत्वाची पदे कंत्राटावर भरणार होते. आघाडी सरकार किंवा महाविकास आघाडीने पोलीस पदासाठी कंत्राटी भरतीचा पर्याय वापरला नव्हता.ज्या विभागांना शक्य आहे त्यांनी वर्ग क आणि ड ची भरती कंत्राटी माध्यमातून करावी.जिथे गरज आहे तिथे पद निर्मिती करा, असा शासन निर्णय आमच्या काळात झाला होता, मात्र अतिकुशल, अर्ध कुशल व अकुशल अशा सर्वच पदांना कंत्राटी पदभरती सक्तीची करून हे कंत्राटी सरकार नोकऱ्या संपवू पाहत आहे.यामुळे आरक्षण व शासकीय नोकरी या दोन्हीही संकल्पना संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव युवकांनी हाणून पाडला.अशा शब्दात वडेट्टीवार यांनी टीका केली.महाविकास आघाडी सरकारमधून कंत्राटी सरकारमध्ये सामील झालेले मंत्री आज टिका करताना दिसत आहेत.आज टिका करणारे तेव्हा काय करत होते.त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ही लढाई अजून थांबली नाही. स्पर्धा परीक्षा मधील पेपरफुटी, परीक्षार्थींना कडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क, भरतीचा कालबध्द कार्यक्रम, अशा अनेक मुद्यांवर आम्ही लढत राहणार, राज्यातील युवक-युवतींना न्याय मिळवून देणार असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleकाँग्रेस आघाडीवर खापर फोडून महायुती सरकारकडून अपयश झाकण्याचा प्रयत्न
Next articleउद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोलेंनी महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी