पुन्हा आंदोलन झाले तर सरकारला झेपणार नाही ! मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत मराठा नेत्यांशी चर्चा करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन पुकारून सरकारला घाम फोडणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उद्या म्हणजेच बुधवारी मुंबईत येत असून,आपल्या मुंबई दौ-यात ते शिवाजी मंदीर येथे मराठा समाजातल्या नेत्याबरोबर बैठक घेणार आहेत.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे.त्यामुळे ते आपला निर्णय येत्या २४ तारखेला जाहीर करणार असल्याने त्यांच्या मुंबई दौ-याला महत्व आले असून,या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.दरम्यान राज्यातील मराठा नेते एकत्र आले तर फक्त दोन तासात आरक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त करीत पुन्हा आंदोलन झाले तर सरकारला झेपणारे नसेल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराटी या गावात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला घाम फोडला होता.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महिन्याचा कालावधी द्यावा अशी विनंती केल्यावर त्यांनी उपोषण सोडले होते. त्यांनतर अनेक जिल्ह्यात सभा घेवून त्यांनी आरक्षणाची धग तेवत ठेवली तर 14 तारखेला अंतरवाली सराठी येथे न भूतो न भविष्यती अशी सभा घेवून त्यांनी गर्दीचे अनेक विक्रम मोडले.सरकारला दिलेली मुदत येत्या २४ तारखेला संपत असून त्याच दिवशी ते आपला पुढील निर्णय जाहीर करणार आहेत.याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईतील मराठा नेत्यांशी चर्चा करण्यासाठी उद्या बुधवारी मुंबईच्या दौ-यावर येत असून,दादर येथील शिवाजी मंदिर येथे ते मराठा समाजाच्या नेत्याशी चर्चा करणार आहेत.शिवनेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.मुंबईत मराठा समाजाच्या नेत्याबरोबर होणा-या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जर ४० दिवसांनंतर आमचे आंदोलन झाले तर ते सरकारला झेपणारे नसेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous articleघरात बसून काम केले असते तर एसटी महामंडळ नफ्यात आले नसते : उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला
Next articleआरटीओतील बदल्यांमधील वशील्याला चाप ? मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय आता बदल्या ऑनलाईन पद्धतीने