अजित पवारांना मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदेंना अर्थमंत्री करा

मुंबई नगरी टीम

मुंबई । अर्थ खात्यावरून चाललेल्या गोंधळावरून अजित पवार यांना मुख्यमंत्री पद द्यावं आणि अर्थमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देऊन हा तिढा सोडवावा असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला.भाजपने युती करण्यासाठी शिवसेना व आता राष्ट्रवादी पक्षातून अनेक नाग गळ्यात अडकवून ठेवले आहेत, ते त्यांना काम करून देणार का असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला.

रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सरकारवर जोरदार टीका केली.मंत्रीपद गळ्यात पडेल या आशेने डोळे लावून बसलेल्यांचे शिवलेले कोट कपाटातच राहतील, अस चित्र सध्या दिसत असल्याचे दानवे म्हणाले.जे सोबत आले आहेत त्यांना शिंदे फडणवीस सरकार न्याय देऊ शकले नाहीत मग अपक्षाला न्याय देणं तर लांबच आहे. अजित पवार हे भाजपच्या दिल्लीवारीवर आधी टीका करत होते आणि आज शालीन नेतृत्व असलेल्या अजित पवार यांनाच दिल्लीच्या दरबारी मुजरे व हुजरेगिरी करावी लागतेय, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीका दानवे यांनी अजित पवारांच्या दिल्लीवारीवर केली.मंत्रीपद त्याग केले अशी भूमिका आज अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मांडली असता त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, शिंदे फडणवीस मंत्रिपद घ्या म्हणून मागे लागलेत का, ते देत नाही मग त्याग कस करताय? या सर्व बनावट गोष्टी असल्याचे दानवे यांनी म्हटले.राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्राने ठाकरेंवर टीका करण्यापूर्वी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनात गंगेत वाहिलेल्या प्रेतांबाबत जाब विचारावा. पंतप्रधान फंडाबाबत पंतप्रधानांना प्रश्न विचारावे अशा शब्दांत दानवे यांनी सुनावले.

Previous articleविधानसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला किती जागा येणार ? बावनकुळेंनी जाहीर केला आकडा
Next articleकिर्र अंधार,घरांवर माती अन्‌ वरुन पाऊस-वारा; ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितला बचावकार्याचा थरार