किर्र अंधार,घरांवर माती अन्‌ वरुन पाऊस-वारा; ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितला बचावकार्याचा थरार

मुंबई नगरी टीम

मुंबई । सर्वत्र अंधार.,पाऊस सुरूच होता. वरुन जोरात वाराही वाहत होता. कुठल्याही यंत्राची मदत घेता येत नव्हती.त्यामुळे माणसांच्याच मदतीने बचावकार्य सुरू होते.इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचलेले ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन पत्रकारांना सांगत होते.पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याचे समजताच महाजन तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले.रात्री तीन वाजेच्या दरम्यान ते इर्शाळवाडीला पोहोचले. त्यांच्यासोबत आमदार महेश बालदी हेदेखील होते.

मदतकार्यातील अडथळे सांगताना महाजन म्हणाले,अंधार असल्याने मोबाईल बॅटरीच्या उजेडात वाट काढत आम्ही घटनास्‍थळ गाठले. खाली पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, प्रांताधिकारी,तहसिलदार आदी अधिकारी व कर्मचारीही होते.तुफान पाऊस कोसळत होता.सोबत जोराचा वाराही होता.सर्वत्र अंधराचेच साम्राज्य होते. डोंगराळ भाग, घटनास्थळी पायी जावे लागणार होते. जाण्याचा रस्ता केवळ ३ फुटाचा. बाजूला खोल दरी, जोराचा वारा आणि वरुन पाऊस. पायी चालणेही कठीण जात होते. अचानक कुठे दरड कोसळेल याचा नेम नव्हता. निघत असतानाच पोलिसांनी धोक्याची सुचना दिली.अचानकपणे कधीही दरड कोसळू शकते असा इशाराही दिला. जवळच्या गावांमधून ५० ते ६० गावकऱ्यांची टीम मदतीकरीता जमवली. तोपर्यंत पहाटेचे ५ वाजले होते. एनडीआरएफची टिम आमच्या मदतीसाठी पोहोंचली होती. डोंगराळ भाग असल्यामुळे बचाव कार्यासाठी जेसीबी वगैरे यंत्रांचा वापर शक्यच नव्हता. खराब हवामान व लँडीगकरिता जागा नसल्यामुळे हेलीकॉप्टरची मदत घेता येत नव्हती. शेवटी अत्याधुनिक तांत्रिक मदतीविना, बचावकार्य सुरु केले. मातीचा मलबा उपसण्याच्या कामी सर्वजण लागले. पाऊस सुरूच होता. त्यामुळे जेवढा मलबा उपसत होतो त्यापेक्षा जास्त मलाबा वरुन पुन्हा जमा होत होता. वाटही निसरडी झाल्याने मदतकार्य करणारे घसरुन पडत होते. सगळी परिस्थिती हाता बाहेरची होती. साधारणत: २५० लोक वस्तीचा हा पाडा. ६० ते ७० व्यक्ती रोजगारासाठी पाड्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे. त्यामुळे सुदैवाने ते या दुर्घटनेतून बचावले. सकाळपर्यंत आजुबाजुच्या गावांतील गावकरी घटनास्थळी जमली. त्यांनीही मदतीचा हात पुढे केला. प्रत्येकजण आप्त-स्वकीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. हे लिहीपर्यंत सुमारे ७५ जणांना बाहेर काढण्यात यश आले होते, अशी माहिती महाजन यांनी दिली.

एकाच ठिकाणी दफन

बचावकार्य सुरु असताना दुर्दैवाने नऊ जणांचे मृतदेह हाती लागले. दफनविधी करण्याचे ठरल्यानंतर खड्डे खोदण्यात आले. पाऊस सुरु असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत होते. ते पाणी आम्ही उपसत होतो. या कठीण प्रसंगात काळजावर दगड ठेवून ते मृतदेह दफन केले, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

डोंगरावर चढत असताना खुप दम लागत होता.आमच्या मागेच शंभर दोनशे फुटावर आमच्या सोबतचा अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यास हृदय विकाराचा झटका आला असावा. यातच दुर्दैवाने त्याला प्राण गमवावे लागले, असे महाजन यांनी सांगितले.

शाळेत झोपलेली सहा मुले सुरक्षित

गावातील शाळेच्या इमारतीमध्ये गावातील ६ मुले झोपलेली होती. सुदैवाने ती या दुर्घटनेमधून सुरक्षित राहू शकली. दरड कोसळण्याच्या आवाजामुळे जागे होऊन या मुलांनी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जवळच्या लोकांना कळवले. त्यामुळे मदतीसाठी अनेकजण धावून आले अशी माहिती महाजन यांनी दिली

Previous articleअजित पवारांना मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदेंना अर्थमंत्री करा
Next articleमुख्यमंत्री सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत ; भर पावसात स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व