राज्यात कुठलेही संकट आले असता कधीही शांत बसलो नाही,न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपा पक्षाने कायम माझा सन्मान केला. यासाठी पक्षाचा ऋणी राहीन.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,भारतीय जनता पार्टी अध्यक्ष जे.पी.नड्डा तसेच देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे राज्याचा विरोधी पक्ष नेता या पदाची जबाबदारी मिळाली. या जबाबदारीने राज्यभर जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी फिरलो.राज्यात कुठलेही संकट आले असता कधीही शांत बसलो नाही.सभागृहात आणि सभागृहाबाहेर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. अशाप्रकारे आपण कुठल्याही पक्षाचे असलो तरी सभागृहाच्या माध्यमातून मिळालेल्या हक्कांच्या आधारे जनतेचा विकास साधायचा हेच अंतिम उद्देश असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले.अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी ते बोलत होते.

निवृत्त विधान परिषद सदस्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलताना दरेकर म्हणाले,विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे सभागृहात कुठलाही मुद्दा उपस्थित करताना सांभाळून घेत असे. प्रत्येक सदस्याला बोलायची संधी देत असे. चूक असल्यास अधिकारवाणीने सांगत असे. अशाप्रकारे सर्व सदस्यांमार्फत चांगल्या वातावरणात कामकाज होण्यासाठी मोलाचे योगदान देण्याचे कार्य सभापतींनी केले आहे. विधान परिषद सदस्य दिवाकर रावते हे संघटनात्मक कामासाठी आदर्श आहेत. कामासाठी फिरणे, अभिनव संकल्पना मांडणे, पक्ष वाढवणे, लोकांचे विषय जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणारे नेते म्हणून मी विद्यार्थी चळवळीत असल्यापासून त्यांना पाहतोय. माय मराठी भाषेचा आदर व्हावा यासाठी त्यांनी कायम आग्रही भूमिका सभागृहात मांडली आहे. सभागृहात सदस्यांकडून इंग्रजीमध्ये उच्चार झाल्यास त्यावर आक्षेप घेण्याचे काम त्यांनी केले आहे अशाप्रकारे मराठीवर निस्सीम प्रेम करणारा सदस्य म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

दरेकर पुढे म्हणाले की,विधान परिषद सदस्य संजय दौंड यांनी देखील सभागृहात कामकाजासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे योगदान दिले आहे. त्याचप्रकारे विधान परिषद सदस्य रवी पाठक यांनी पालघर आणि ठाणे व त्यांच्या मतदार संघाच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. विधान परिषद सदस्य सुभाष देसाई यांनी शिवसेनेचा नेता या नात्याने तसेच सरकारच्या माध्यमातून व सभागृहाच्या माध्यमातून सभागृहात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनीदेखील सभागृहातील कामकाजात अत्यंत मेहनत घेतली आहे. विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला आहे. अलीकडच्या काळात चांगले वक्तव्य देखील केले असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

विधान परिषद सदस्य विनायक मेटे यांनी टोकाचा आग्रह धरणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. मराठा आरक्षणाच्या व्यथा मांडणे हा त्यांचा प्राधान्याचा विषय राहिला आहे. विधान परिषद सदस्य सुरजितसिंह ठाकूर यांनी देखील स्वतःची कुशल संघटक म्हणून ओळख निर्माण केली आहे. याच प्रकारे विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचे नेते म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आग्रहाने भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आणि सभागृहात विषयाला वाचा फोडली आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांविषयी बांधिलकी असणारा नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील, असे दरेकर म्हणाले.आज विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, संजय दौंड, प्रसाद लाड, दिवाकर रावते, रवी पाठक, सुभाष देसाई, विनायक मेटे, सुरजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत हे विधान परिषद सदस्य निवृत्त झाले.

Previous articleभाजप -महाविकास आघाडीतील संघर्ष चिघळणार ; मविआ कारवाईला जशास तसे उत्तर देणार !
Next articleगरिबीमुळे पडेल ते काम केले ; १९ व्या वर्षी आमदाराच्या मुलीला पळवून नेऊन विवाह केला