भाजप -महाविकास आघाडीतील संघर्ष चिघळणार ; मविआ कारवाईला जशास तसे उत्तर देणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्य मंत्रिमंडळातील तीनही पक्षांच्या ज्येष्ठ मंत्र्यानी या विषयावर चर्चा केल्याची समजते.केंद्रातील भाजपच्या सरकारने तपास यंत्रणाचा चुकीच्या पध्दतीने वापर करत राजकीय हेतूने आघाडी सरकार मधिल मंत्री,नेते यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर सूडाच्या हेतूने सुरू केलेल्या कारवाईला जशास तसे उत्तर द्यावे असा बहुतांश नेत्यांचा सूर असल्याचे या बैठकीत उमटल्याची चर्चा आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली.या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई संदर्भात चर्चा झाल्याचे समजते.केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून केंद्रातील भाजप सरकार महाविकास आघाडीतील मंत्री आणि त्यांच्या नाकेवाईकांवर सूडाने कारवाई करीत असल्याने या कारवाईस जशास तसे उत्तर देण्याची मागणी बहुसंख्य मंत्र्यांनी केल्याचे सांगण्यात येते.हिवाळी अधिवेशनाची सांगता होताच या संदर्भात महत्वाच्या अधिका-यांची बैठक घेतली जाणार असल्याची माहिती एका ज्येष्ठ मंत्र्यांनी दिली.सूत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकारकडून भाजपच्या नेत्यांशी संबंधीत अनेक प्रकरणांच्या चौकशी संबंधित माहिती या अधिका-यांकडून घेतली जात आहे. त्यामुळे जशात तसे उत्तर दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर या विषयावर कायदेतज्ज्ञांची मदत घेतली जात असून अशा प्रकारच्या कारवाईला कायदेशीर पध्दतीने उत्तरे दिली जाणार असल्याचे शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नेमकी भुमिका मात्र समजू शकली नसली तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांवरील या व्यक्तिगत हल्ल्याचा निर्धाराने मुकाबला करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी कॉंग्रेस पक्षांचे प्रभारी एच के पाटील मुंबईत आले असून त्यांनी देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करत या अन्यायाविरोधात एकजुटीने तीन्हीही पक्ष लढतील असा विश्वास व्यक्त केल्याचे समजते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या संदर्भात तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक होणार असल्याचे कळते.

Previous articleनारायण राणे, कृपाशंकर सिंहांवर किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपाचे काय झाले ?
Next articleराज्यात कुठलेही संकट आले असता कधीही शांत बसलो नाही,न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो