अटलजी आणि मोदींच्या जीवावर पदे उपभोगणारे आता इतरांना शिकवतायत

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात रंगलेली टोलेबाजी काही संपण्याचे नाव घेत नाही.आज पुन्हा प्रसाद लाड यांनी खडसेंवर सडकून टीका केली आहे. अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पदे उपभोगली तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत,असे प्रत्युत्तर प्रसाद लाड यांनी दिले.यावेळी त्यांनी खडसेंनी दिलेली आव्हान देखील स्वीकारले आहे.गेल्या दोन दिवसांपासून खडसे आणि प्रसाद लाड यांच्यात शाब्दिक वॉर सुरू आहे.

भाजपने माझ्या मुलीला निवडणुकीत हरवले,असा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. यावर प्रसाद लाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.”आजवरच्या राजकारणात भाजप संघटन आणि रा.स्व.संघाच्या जीवावर निवडून येणारे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत.तरीही पक्ष नेतृत्वाला दोष देऊन पक्ष त्याग केला.ज्या पक्षाने एवढं दिलं. अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच नेते आता इतरांना शिकवत आहेत”, अशी टीका त्यांनी केली. “स्वतःची एवढी ताकद होती, तर स्वतःच्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? मी नक्कीच स्वतः ७ वेळा निवडून येईन याची मला खात्री आहे!”, असे म्हणत त्यांनी खडसेंचे आव्हानच एकप्रकारे स्वीकारले आहे.

जनतेने मला सलग सहा वेळा निवडून दिले. प्रसाद लाड यांनी किमान एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी दिले होते. तसेच माझ्या मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षविरोधी काम करण्यात आले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा ही जागा पाडण्यासाठी आतूनच पाठिंबा होता, या आरोपाचा देखील त्यांनी पुनरुच्चार केला होता. दरम्यान, प्रसाद लाड यांच्या बोचऱ्या टिकेनंतर एकनाथ खडसे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleबाळासाहेबांनी हिंदुत्वाचा दिलेला विचार बळकट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काम करावे
Next articleउद्धव ठाकरे पदासाठी कसलीही तडजोड करतात : नारायण राणे