उद्धव ठाकरे पदासाठी कसलीही तडजोड करतात : नारायण राणे

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही. ते गद्दारी करून सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत.तडजोड करणारे, पदासाठी हवे ते करू शकणारे ते आहेत.म्हणून हिंदुत्व विचार आणि शिवसेना हे समीकरण नाही, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचे आयोजन केले होते. नारायण यांनी आंदोलनाला पाठिंबा देत शिवसेनेवर निशाणा साधला.

जनआक्रोश आंदोलन करण्यापूर्वीच आमदार राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्यानंतर काही वेळाने राम कदम यांची सुटका करण्यात आली.यावेळी खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी खार पोलीस स्टेशनला जाऊन राम कदम यांची भेट घेतली. माध्यमांशी संवाद साधताना राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.कोरोना काळात आंदोलन करू नये अशी विनंती पोलिसांनी राम कदम यांना केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. पालघर प्रकरणी सरकारने पाहिजे तशी चौकशी केली नाही. महाराष्ट्रात जे सरकार बसले आहे, त्यांची साधूंना न्याय देण्याची इच्छा नाही, अस म्हणत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा,अशी आमची मागणी असल्याचे नारायण राणेंनी सांगितले.

शिवसेनेच्या हिंदुत्वाला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही असे त्यांचे म्हणणे आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, त्यांचे हे म्हणणे बरोबरच आहे. कारण उद्धव ठाकरे कुठल्याही परीक्षेला बसत नाहीत,पास होत नाही.त्यामुळे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली. राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत, असे म्हणणार नाही. पण शिवसेना पक्ष हिंदुत्ववादी राहिलेली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. ते गद्दारी करून सत्तेत गेलेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदूत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवे ते करू शकणारे ते आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार आणि शिवसेना हे समीकरण नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केले नाही. पिंजऱ्यात बसून राहतात त्यामुळे राम कदम यांना आंदोलन करावे लागत आहे. २१२ दिवस होऊनही पालघरचा तपास पूर्ण होत नाही. त्याला विरोध करण्यासाठी राम कदम यांनी जनआक्रोश आंदोलन पुकारले, असे नारायण राणेंनी म्हटले. तसेच पालघर हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे सोपवले जात नाही, तोवर हा संघर्ष थांबणार नाही, असा निर्धार राम कदम यांनी केला आहे. तर आज या संघर्षाची ठिणगी पडली आहे. आता संघर्षाचा वणवा पेटेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील गडचिंचले हत्याकांडात मारलेल्या साधूच्या नावे दिवा लावण्यासाठी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Previous articleअटलजी आणि मोदींच्या जीवावर पदे उपभोगणारे आता इतरांना शिकवतायत
Next articleवीज बिल भरणार नाही,सरकारमध्ये हिंमत असेल तर वसूल करून दाखवावे