वीज बिल भरणार नाही,सरकारमध्ये हिंमत असेल तर वसूल करून दाखवावे

मुंबई नगरी टीम

मुंबई : लॉकडाउन काळातील वीज बिले नागरिकांना भरावी लागणार असे म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घुमजाव केल्यानंतर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वीज बिल आम्ही भरणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आमच्याकडून वीज बिलाची वसुली करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सरकारला हा इशारा दिला आहे.

“लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचे घरगुती विजेचे बिल हे सरकारने माफ केलेच पाहिजे. त्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नाही. लॉकडाउनच्या काळातील वीज बिल सामान्य माणूस भरणार नाही, हे मी ठामपणे सांगतो. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी वीज बिल वसूल करून दाखवावी”, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. दरम्यान, लोकांनी वीज वापरली त्याचे बिल भरावे. कुठलीही वीज बिल माफी मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच नाराजी पसरली आहे. तसेच विरोधी पक्षाकडूनही सरकारच्या या भूमिकेवर टीका केली जात आहे.

लॉकडाउनच्या काळात राज्यातील अनेक भागांतील व्यावसायिक आस्थापनांसह सामान्य नागरिकांना देखील मोठ्या रकमेची वीज बिले आली होती. कोरोनामुळे आधीच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून अनेक उद्योगधंदे देखील बंद असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे विजेच्या बिलात सूट द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर नितीन राऊत यांनी वीज बिले कमी केली जातील, असे आश्वासन दिले होते. तर आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर घुमजाव करत वीज बिले भरावी लागतील, असे म्हटले आहे.

Previous articleउद्धव ठाकरे पदासाठी कसलीही तडजोड करतात : नारायण राणे
Next articleचार वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या