धनंजय मुंडेंची वचनपूर्ती तर अजून एक घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामागारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार या संदर्भातीलशासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला होता.यासाठी आता वेब व मोबाईल अँप तयार करून त्याव्दारे ही नोंदणी करण्यात येणार आहे.तर दुसरीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागास सादर करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामागारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला होता. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे यासाठी आता वेब व मोबाईल अँप तयार करून त्याव्दारे ही नोंदणी करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय मुंडे यांच्या निर्देशानुसार आज निर्गमित करण्यात आला असून सदर वेब पोर्टल व मोबाईल अँप तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी) कडे सोपवण्यात आले असल्याचेही सदर शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाआयटी मार्फत कमीत कमी वेळेत हे वेब पोर्टल व मोबाईल अँप तयार करून कार्यान्वित करण्यात यावे व सध्या ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेली राज्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी ऑनलाईन करून तातडीने पूर्ण करण्यात यावी, यासाठी महाआयटीला आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे काम केवळ कागद व घोषणापूरते मर्यादित राहीले होते. मात्र सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे. प्रथमच राज्यात ऊसतोड कामगारांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी वसतिगृह उभारणी, इमारत अधिग्रहण आदी प्रक्रिया देखील सुरू आहे. बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठी एका मोबाईल अँपचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी ही संकल्पना संपूर्ण राज्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार आता राज्यभरातील ऊसतोड कामगारांच्या डिजिटल नोंदणीसाठी वेब पोर्टल व मोबाईल अँप सुरू करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे मंत्रालयातील दालनात राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार मित्र संघाच्या विविध मागण्यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून पुरस्कारार्थींनी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारण, निमआराम व आराम गाडयातून तसेच भाडे तत्वावर असलेल्या बसेसमधून मोफत प्रवास देण्याबाबत गृह विभागाला दिवाळीच्या आधी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच मानधनाबाबतीत वित्त विभागाला माहिती सादर करून याबाबतीतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुंडे यांनी दिली.

Previous articleराज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिवाळीपूर्वी सर्व मानधन मिळणार
Next articleसंप मागे : एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता