संप मागे : एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता

मुंबई नगरी टीम

मुंबई । परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करुन खुशखबर दिली आहे. ॲड. परब यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले बेमुदत उपोषण मागे घेतल्याचे जाहिर केले. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून राज्यभरातील एसटीची वाहतूक सुरळीत सुरु होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने कालपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री परब यांनी आज मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे, कर्मचारी व औद्योगिक संबंध खात्याचे महाव्यवस्थापक माधव काळे, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सुहास जाधव, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर आदी उपस्थित होते. या बैठकीत एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडणार आर्थिक भार याचा ऊहापोह करत मंत्री ॲड.परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचे त्यांनी जाहीर केले.

Previous articleधनंजय मुंडेंची वचनपूर्ती तर अजून एक घेतला महत्वाचा निर्णय
Next articleहोय…मी भंगारवाला,एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही