होय…मी भंगारवाला,एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । होय…मी भंगारवाला आहे,त्यांना भंगारवाल्याची किमयागिरी काय आहे हे त्यांना माहित नाही.त्यांचा एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही असा इशारा देतानाच जो जीन आहे (भूत) त्याचा जीव एका पोपटात होता तो हाच पोपट तुरुंगात जाणार असल्याने जे राक्षसी विचाराचे भाजपचे लोक आहेत ते घाबरले म्हणून आपले प्रकरण बाहेर येवू नये यासाठी धडपड करत असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

महाराष्ट्रातील जनतेला व महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान समीर वानखेडे याच्या माध्यमातून होत आहे हे पहिल्यादिवसापासून बोलत असल्याचे मलिक यांनी सांगितले.हे कटकारस्थान भाजपकडून सुरू आहे.राज्यातील सरकारला,मुंबईला,बॉलिवूडला बदनाम करुन योगी महाराज नोएडामध्ये बॉलिवूड निर्माण करत आहे. त्यांना वाटतंय की बॉलीवूडला बदनाम केले की बॉलिवूड बाहेर जाईल परंतु त्यांना माहीत नाही बॉलिवूड बनवण्यासाठी दादासाहेब फाळके, व्ही शांताराम व काही मराठी कलाकार व दिग्दर्शकांनी ओळख दिली आहे. बॉलिवूड देशाची संस्कृती व ओळख संपूर्ण जगात घेऊन जात आहे. बॉलिवूडच्या गाण्यातून लोक भारतदर्शन करतात. बॉलिवूडच्या माध्यमातून राज्यात,मुंबईत लाखो लोकांचा रोजगार चालतो. बॉलिवूडला बदनाम करुन योगी महाराज जर ‘युपीवूड’ करण्याचा विचार करत असतील तर त्यांचे स्वप्न स्वप्नच राहील असा इशाराही मलिक यांनी दिला.

मी आज नाव घेत नाही परंतु भाजपचे मोठमोठे नेते एनसीबीच्या कार्यालयात समीर वानखेडे यांना भेटायला जात आहेत.भाजपचे काही नेते त्यांचे उजवेहात समीर वानखेडेला भेटत आहेत हे जबाबदारीने सांगत असल्याचे सांगताना कालपासून या हालचाली वाढल्याचेही मलिक म्हणाले. काशिफ खान कोण आहे याचा तपास किंवा शोध पत्रकारांनी घ्यावा.काशिफ खान हा क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा आयोजक होता.त्याचा सेक्स,ड्रग्ज,पोर्नोग्राफी याचे मोठे रॅकेट चालवतो परंतु त्याच्यावर कारवाई झाली नाही शिवाय १३०० लोकांचीही साधी चौकशी झाली नाही.रेव्ह पार्टी होणार याची कल्पना एनसीबीला होती.आयोजकांची माहिती होती.त्याची चौकशी का झाली नाही. क्रूझवर ड्रग्जची झाडाझडती का झाली नाही.समीर वानखेडे यांचे संबंध होते म्हणून चौकशी झाली नाही का ? असे अनेक सवाल करतानाच काशिफ खान याच्याकडे कुणाकुणाची पैसे आहेत याची कसून चौकशी झाली तरहे सगळे बाहेर येईल असेही मलिक म्हणाले.

आज मी काही बोलणार नाही. जे काही हत्यारे माझ्याकडे राहू द्या.विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे.विधानसभेच्या आधी बोललो तर लोकांना वेगळ्या पद्धतीने कोर्टकचेरी करतील परंतु अधिवेशनात जे काही माझ्यावर आरोप होणार आहेत त्याचे उत्तर देताना जे काही समोर आणणार आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात तोंड दाखवण्यास कठीण होऊन जाईल. त्या नेत्यांची नावे आज सांगत नाही माझ्यावर अधिवेशनात हल्ला झाल्यावर मोठमोठी नावे जाहीर करेन असा स्पष्ट इशाराही मलिक यांनी आज दिला. या स्टोरीचा मध्यांतर झालाय.जो पकडून घेऊन जात होता तो तुरुंगात गेलाय. जी लोकं कालपर्यंत जामीन होऊ नये या भूमिकेत होते मात्र स्वतःला अटक होणार नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. क्लायमॅक्स सुरू झाला आहे काल मध्यांतर झाला आणि आजपासून नवीन परिस्थिती निर्माण झाली. पिक्चरबाबत आता संजय राऊत यांनी नवाब मलिक यांच्या मध्यांतरनंतर मी बोलणार असे जाहीर केले आहे त्यामुळे सलीम – जावेद सारखं दोघांना मिळून काम करावं लागेल अशी मिश्किल टिप्पणी मलिक यांनी केली.

माझी शंभर कोटीची औकातच नाही.भाजपने माझा ब्रॅण्ड शंभर कोटीचा केला आहे. सगळं विकलं गेलं तरी माझ्याकडे शंभर कोटी होणार नाहीत. मला भंगारवाला बोलत आहेत त्यांना माहीत नाही भंगारवाला काय असतो… होय मी भंगारवाला आहे. माझ्या वडिलांनी मुंबईत कपडे व भंगाराचा व्यवसाय केला. मी वयाच्या सोळा वर्षापासून राजकारणात आमदार होईपर्यंत भंगाराचं काम करत होतो. मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे असे ठामपणे मलिक यांनी आरोप करणा-या भाजपला सुनावले. माझ्या आजोबाने डाकूकडून सोनं घेतलं नाही.माझ्या वडिलांनी चोराकडून सोनं खरेदी केलं नाही.मी स्वतः मुंबईत सोन्याची तस्करी केली नाही.बुलीयन मार्केट बुडवलं नाही.माझ्या घरावर सीबीआयची धाड पडलेली नाही.माझ्यावर कुठलेही आरोप नाही.मी टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनला दिलेला चेक बाऊन्स करण्याचं काम केलं नाही.मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेला चेक बाऊन्स केला नाही अशा शब्दात त्यांनी नाव न घेता मोहित कंबोज यांच्यावर निशाणा साधला.होय मी भंगारवाला आहे… भंगारवाल्याची किमयागिरी काय असते यांना माहीत नसावी. एखादा भंगारवाला जी वस्तू उपयोगात नसते ती उचलून आणतो… त्याचे तुकडे तुकडे करून ते भट्टीत टाकून त्याचे पाणी पाणी करतो… नवाब मलिक जितके भंगार या शहरात आहेत त्या भंगारांचे एक एक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकून पाणी केल्याशिवाय थांबणार नाही असा स्पष्ट इशाराही मलिक यांनी यावेळी दिला.

क्रांती रेडकर तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करणा-या लोकांच्या षडयंत्राचा भाग आहात. तुमचा नवरा त्या षडयंत्राचा भाग आहे.जो महाराष्ट्राला बदनाम करत आहे.सरकारला बदनाम करत आहे. महाराष्ट्राची अस्मिता कशी संपुष्टात येईल यावर खेळत आहे.महाराष्ट्राच्या नावावर,स्थानिक अस्मितेच्या नावावरची जी चादर ओढण्याचे काम करताय त्यात कोणतीच मदत होणार नाही. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहात. मुख्यमंत्र्यांनी कुणाला भेटावं कुणाला नाही हा त्यांचा अधिकार आहे. मात्र महाराष्ट्रातील १४ कोटी जनता जर कुठला गुन्हा करत असेल तर आणि बोलत असेल की, आमचा गुन्हा माफ करा कारण आम्ही महाराष्ट्रात राहणारा आहे तर न्यायासमोर जात धर्म पंथ नसते. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्यामुळे ज्या काही गोष्टी समोर येत आहे त्यावर त्यांना शिक्षा होईल असेही मलिक यांनी सांगितले.दाढीवाला कोण आहे तर काशिफ खान आहे आणि हा फॅशन टिव्हीचा इंडिया हेड आहे. या फॅशन शोमध्ये ड्रग्ज विकले जाते. सेक्स रॅकेट चालवले जाते. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा आयोजक काशिफ खान होता हे त्याने सोशल मीडियावर निमंत्रण देऊन सांगितले होते. रविवारी संध्याकाळी ६.२६ वाजताचा एक व्हिडीओ त्याने त्याच्याच साईडवर अपलोड केला होता. आपल्या गर्लफ्रेंड सोबत डान्स करताना तो व्हिडीओत दिसत आहे. त्याचवेळी समीर वानखेडे याला प्रश्न केला होता की, हा दाढीवाला कोण आहे. त्या दाढीवाल्याला समीर वानखेडेने का विचारलं नाही. त्याला अटक का केली नाही. अवैध धंदे करणार्‍या या काशिफ खानसोबत समीर वानखेडेचे चांगले संबंध आहेत. एका अधिकाऱ्याने या दाढीवाल्यावर धाड टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी समीर वानखेडेने रोखले होते असे सांगितले आहे. तीन दिवसापूर्वी समीर वानखेडे काशिफ खानला अटक का करत नाही असा प्रश्न केला होता असेही मलिक म्हणाले.

हे प्रकरण इतकं दलदलीत अडकलं आहे की, जितका शोध घेतला असता अजून काही प्रकरणे समोर येत आहेत. माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करा मी जामीन घेऊन पुन्हा माझी लढाई लढेन परंतु आता मी न्यायालयात जावे असे सांगत आहेत मग वानखेडे न्यायालयात का गेले? माझ्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधू नये. सोशल मिडियावर पोस्ट टाकू नये यावर बंदी घालावी. मात्र हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी यावर तात्काळ सुनावणी घेण्यास हरकत घेतली. निष्पाप लोकांना या देशात बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो काढून घेण्याचा डाव समीर वानखेडे याचा होता. एखाद्याला बोलण्यापासून किंवा लिहिण्यापासूनचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखं आहे. कुणालाही बोलण्या-लिहिण्यापासून रोखू शकत नाही. कुणी एखाद्याची बदनामी करत असेल तर त्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. त्या हत्याराचा वापर व्हायला हवा असेही मलिक यांनी सांगितले.
काल समीर वानखेडे याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे त्यात त्यांनी मराठी आहोत. मराठी असल्याने सहकार्य करावे असे म्हटले आहे. मग नवाब मलिक यांचे कुटुंब ७० वर्षापासून या शहरात आहे. नवाब मलिकसुध्दा मराठी आहे. या राज्याचा नागरीक आहे मग तो महाराष्ट्राचा नाही, मराठी नाही का? असा सवालही मलिक यांनी केला आहे.ज्याप्रकारे एक महिन्याच्या कालावधीत रोज नवनवीन वस्तू समोर येत आहेत. समीर वानखेडेने सर्व प्रकार करुन पाहिले.पहिल्यांदा बोलला की माझ्या कुटुंबाला यात घेतलं जात आहे त्यानंतर विधान केले की आईची बदनामी केली जात आहे. मी कधीही त्याच्या आईचे नाव घेतलं ना कधी बोट दाखवलं. मी जो जन्मदाखला टाकला होता त्यामध्ये दाऊद वानखेडे त्याच्या वडिलांचे नाव आहे एवढंच बोललो होतो. बहिणीबाबत बोलताना प्लेचर पटेलने लेडी डॉन बोलल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. समीर वानखेडेच्या पहिल्या बायकोचा फोटो टाकला त्यावेळी लोकांनी प्रश्न केला हा फोटो का टाकला. मात्र तो फोटो त्यांच्या इच्छेनुसार सार्वजनिक करण्यात आला होता. समीर वानखेडेची आताची बायकोचं कधीही नाव घेतलं नाही किंवा उल्लेखही केला नाही. मला वाटतं ही लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही तर कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही तर कुणाच्या धर्मावर नाही तर माझी लढाई फर्जीवाडा करण्यात आला त्याविरोधात आहे.

आज मुंबईच्या तुरुंगात निष्पाप लोकांना अटक करुन ठेवण्यात आले आहे. त्यांना चुकीच्या पध्दतीने फसवलं गेलं आहे. स्पेशल – २६ चे पत्र दिले होते. त्यावेळी चौकशी करणार असे सांगण्यात आले. नंतर निनावी पत्राची चौकशी करता येत नाही असे सांगितले गेले. परंतु हा गंभीर विषय आहे. ज्याप्रकारे २६ प्रकरणाचा उल्लेख झाला आहे त्यावरून त्या प्रकरणाची चौकशी करावी २२ नंबर केसचा उल्लेख शेखर कांबळे या पंचाने करत वस्तुस्थिती मांडली आहे. त्यामुळे आज पुन्हा एक पत्र एनसीबीला दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करा. बोगस प्रकरणात आत असलेल्या लोकांची चौकशी करा व त्यांना न्याय द्या आणि फर्जीवाडा केलाय त्यांना शिक्षा द्या अशी मागणी त्या पत्रात केल्याचे मलिक यांनी सांगितले.

Previous articleसंप मागे : एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता
Next articleखुशखबर : वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर,कोणत्या कर्मचा-यांना किती बोनस मिळणार ?