आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर आरोप करणा-यांच्या विरोधात काय भूमिका घेणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । पत्राचाळ प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी करावी,अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.या आरोपावर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत चौकशीला आम्ही तयार आहोत.जेवढ्या लवकर करता येईल तितक्या लवकर चौकशी करा मात्र चौकशी झाल्यानंतर जो आरोप करण्यात आला आहे त्यात वास्तव आणि सत्याला धरुन नसेल तर आरोप करणा-यांच्या विरोधात काय भूमिका घेणार हे राज्यसरकारने जाहीर करावे असे थेट आव्हान शरद पवार यांनी सरकारला दिले.

पत्राचाळ प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.त्यांच्या या आरोपनंतर एकच खळबळ उडाली आहे.भातखळकरांच्या या आरोपवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.पत्राचाळ घोटाळा प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. आम्ही चौकशीला तयार आहोत.पण चौकशीनंतर आरोप सत्याला धरून नसेल,तर आरोप करणाऱ्याच्या विरोधात राज्य सरकार काय भूमिका घेणार असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या पत्राचाळ प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती माध्यमांना दिली. त्यावेळी जी बैठक झाली त्याचे इतिवृत्त गृहनिर्माणचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या सहीचे पत्रासहीत माध्यमांसमोर ठेवले. बैठका घेऊन मध्यममार्ग काढणे, संवाद साधणे चुकीचं आहे का असा सवाल करतानाच वेगवेगळ्या बैठकांचा उल्लेख आव्हाड यांनी यावेळी केला.याप्रकरणी चौकशी करण्यास आमचा विरोध नाही मात्र पराचा कावळा करु नका. मी १९९० पासून आजपर्यंतचा साक्षीदार आहे. आपण हत्तीच्या मर्मस्थळावर घाव घातल्यावर हत्ती उसळतो असे समाजाचे मत आहे. महाराष्ट्राचे मर्मस्थळ शरद पवार आहेत हे लक्षात ठेवा असेही त्यांनी अतुल भातखळकर यांनी ठणकावून सांगितले.

जी कागदपत्रे सादर केली त्यात चौकशी करणा-या यंत्रणेने काय म्हटले आहे त्याचे वाचन आव्हाड यांनी केले.हा शरद पवार यांना बदनाम करण्याचा डाव आहे.आम्ही बेछूट आरोप करत नाही.जी पक्षाची आणि पवार यांची भूमिका आहे ती देशाला आणि राज्याला माहित आहे. तुम्ही आरोप केलाय ना भाजपचे अध्यक्षही काहीतरी म्हणाले आहेत.त्यामुळे ताबडतोब चौकशी करा.अहवाल घ्या आणि हे आरोप बेछूट आणि बेजबाबदार असतील तर संबंधितावर काय कारवाई करणार हे जाहीर करा अशी मागणीही आव्हाड यांनी यावेळी केली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी ला २७७ जागा मिळाल्या असून भाजप – शिंदे गटाला २१० जागा मिळाल्या आहेत. यामध्ये ६०८ जागांपैकी १७३ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर आहे तर भाजप – १६८, कॉंग्रेस – ८४, शिंदे गट – ४२ आणि शिवसेना यांची अधिकृत आकडेवारी आलेली नाही अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.आम्हाला माहीत असलेल्या आमच्या जागा आम्ही सांगितल्या आहेत आता त्यांना वाटत असेल त्यांच्या जागा जास्त आहेत तर त्या आनंदात त्यांनी रहावे आम्हाला त्याची चिंता नाही असा टोलाही शरद पवार यांनी भाजपला लगावला. राज्यात अनेक प्रश्न आहेत त्यात काही प्रश्नांवर लोकांमध्ये अस्वस्थता आहे. राज्यसरकारने जे काही निर्णय बदलले आहेत त्यांचे हे कारण आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळामध्ये काही मुले किंवा पालकांचा मृत्यूमुखी झाला. त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याचा निर्णय माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला होता. त्यामध्ये अडीच हजार रूपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. तो निर्णय शिंदे सरकारने स्थगित केला आहे. ही माहिती खरी असेल तर राज्यसरकारने लवकरच हा निर्णय लागू करुन अनुदान दिले पाहिजे अशी मागणी पवार यांनी केली.इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील अशा अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील कुटुंबाची अवस्था गंभीर आहे याकडे राज्यसरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी आग्रही मागणीही पवार यांनी केली.यावेळी वेदांता फॉक्सकॉनबाबत पवार यांनी मत व्यक्त केले या प्रकल्पाबाबत मला वेगळे मत मांडायचे नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता त्यासाठी जागाही ठरली होती. एका नव्या प्रकल्पाला संधी मिळाली असती त्यामुळे हा प्रकल्प येथे होणे गरजेचे होते मात्र नाही झाला. तो गुजरातला गेला आता हा प्रकल्प देशात कुठेतरी होतोय म्हणून मी विरोधाला विरोधी भूमिका घेणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच राज्यसरकारने गुंतवणूकीचे वातावरण तयार केले पाहिजे. राज्यात काम करत असताना त्यावेळी गुंतवणूक करायला येणाऱ्या लोकांना एक विश्वास द्यायला लागायचा त्यावेळी राज्यात गुंतवणूक वातावरण चांगले होते त्याला धक्का बसला असेल परंतु येथे राजकीय भूमिका न घेता सगळ्यांनी राज्याच्या हिताच्या गुंतवणूकीचे वातावरण तयार करायला हातभार लावावा असा सल्लाही पवार यांनी दिला.

आज एका वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर एनडीएच्या कारकीर्दीत ईडीने किती जणांवर कारवाया केल्या. कोणत्या राजकीय पक्षांवर केल्या हे सर्वांना मार्गदर्शक ठरणारे वृत्त आले आहे. या कालावधीत समाजाचे प्रश्न बाजूला ठेवून आपल्याला ज्या अपेक्षा आहेत त्या निवडणूकीनंतरच्या आहेत. त्याबद्दलची शंका दूर करण्यासाठी अन्य पक्षांच्या लोकांवर खटले भरायचे, चौकशी लावायची, अटक करायची या सगळ्या गोष्टी महत्वाचा कार्यक्रम म्हणून घेतल्या जात आहेत असा थेट आरोप नाव न घेता करतानाच त्याला राजकीयदृष्टया आम्ही तोंड देणार आहोत असे स्पष्टपणे पवार यांनी जाहीर केले.राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वांचे असतात.त्यांनी राज्याचा विचार करायला हवा. त्यांना स्वतःला माहित आहे अनेकदा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांनी भूमिका मांडली. त्यामुळे याच्यात वाद वाढवू न देण्याची जबाबदारी ही राज्यप्रमुखाची आहे. आता शिंदे गटाला बीकेसीमध्ये मेळावा घ्यायला जागा मिळाली आहे याचा आनंद आहे. त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. त्यानंतर जी एक परंपरा आहे त्या परंपरेसंदर्भात पहिल्यांदा मागणी उध्दव ठाकरे यांनी केली असेल तर त्या मागणीवर विलंब लावणे योग्य नाही हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा अशी अपेक्षा पवार यांनी दसरा मेळावा वादाबाबत व्यक्त केली.

महाविकास आघाडी सरकारने सण बंद केले होते असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात निर्णय घेतला परंतु देशाच्या पंतप्रधानांनी देशाला आवाहन केले त्या काळात हे सण, उत्सव, सभा, संमेलन,लग्न या सगळ्या गोष्टींवर मर्यादा लावण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय धोरण पंतप्रधानांनी मांडले ते महाराष्ट्राने पाळले याची जाण जाणकारांना असली पाहिजे त्यामुळे ते सणांवर बंदी होते असे काही म्हणोत पंतप्रधानांचा निर्णय योग्य होता असेही पवार म्हणाले.

Previous articleदेशात चित्ते आणल्याने रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का ? अजित पवारांचा रोखठोक सवाल
Next articleभूमीपुत्रांवर अन्याय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने होतोय का ? आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले