भूमीपुत्रांवर अन्याय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने होतोय का ? आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले

मुंबई नगरी टीम

मुंबई । वेदांता-फॉक्सकॉन,बल्क ड्रग पार्क प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प परराज्यात गेल्याची माहिती समोर आणल्यानंतर आता युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकर भरतीसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली.लोकांच्या हिताचे काम करणाऱ्या आघाडी सरकारला पाडून आलेल्या शिंदे सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे,अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.भूमीपुत्रांवर अन्याय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने होतोय का ? असा सवालही त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सेनाभवनमध्ये पत्रकार परिषद घेत वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी लागणाऱ्या स्थापत्य अभियंत्यांची नोकर भरतीसाठीचा मुद्दा उपस्थित करत धक्कादायक खुलासा केला.वर्सोवा बांद्रा सी लिंकचे काम सुरू आहे.या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन आढावा घेतला की नाही माहीत नाही.वर्सोवा-बांद्रा प्रकल्प दुसऱ्या कंत्राटदारकडे दिला आहे. या कंपनीचे नाव घेत नाही कारण वेदांतावर जसा दबाव आणून ट्विट करायला लावले तसे लावतील.या कंपनीने नोकरीसाठी मुलाखती या चेन्नईमध्ये ठेवल्या आहेत.महाराष्ट्राच्या मुलांसाठी महाराष्ट्रात कुठेच मुलाखती नाहीत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने चालले आहे तसे नसेल तर मुख्यमंत्र्यांचा धाक राहिला नाही असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्याकडून दररोज केवळ राजकीय प्रवेश सुरू आहेत,प्रवेश करत रहा पण महाराष्ट्रात रोजगार कधी येणार ? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्प हा महाराष्ट्रात होत आहे आणि नोकरीसाठी मुलाखती या चेन्नईला घेतल्या जात आहेत.यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे आणि त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करीत हे त्यांच्या सहकार्याने होत आहे का हे त्यांनी स्पष्ट करावे असेही ते म्हणाले,महाराष्ट्रात चांगले अभियंते आहेत, भूमिपुत्र आहेत त्यांना संधी का नाही, फक्त चेन्नईत मुलाखती का ? भूमीपुत्रांवर अन्याय मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने होतोय का ? असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

Previous articleआरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर आरोप करणा-यांच्या विरोधात काय भूमिका घेणार
Next articleआता पोलिसांना वर्षातून २० दिवस नैमित्तिक रजा मिळणार